मुंबई महापालिकेच्या अनेक मालमत्तांचे संरक्षण करण्यासाठी १ मार्च १९६६ रोजी पालिकेचे स्वत:चे सुरक्षा रक्षकदल स्थापन करण्यात आले. पालिकेची रुग्णालये, कार्यालये, पर्यटनस्थळे, जलशुद्धिकरण केंद्रांसारखी महत्त्वाची आस्थापने आदींची सुरक्षा या दलाच्या हाती आहे. मात्र गेल्या दीड दोन दशकांत अतिरेकी हल्ल्यांच्या सततच्या भीतीमुळे या दलावरील जबाबदाऱ्यांमध्ये मोठी वाढ झाली आहे. या दलाला आधुनिक प्रशिक्षण, हत्यारे देऊन ते सुसज्ज करण्याची गरज आहे. या पाश्र्वभूमीवर मुंबई पोलीस या दलाला खास प्रशिक्षण देणार आहेत.
मुंबई महापालिकेच्या सुमारे अडीच हजार सुरक्षा रक्षकांना आता मुंबई पोलिसांकडून प्रशिक्षण देण्यात येणार आहे. मुंबईची सुरक्षा व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. या सुरक्षा रक्षकांना संभाव्य घातपात विरोधी कारवाया रोखून त्यांना प्रतिंबंध घालण्यासाठी हे विशेष प्रशिक्षण देण्यात येणार आहे.   मुंबई महापालिकेच्या मालकीची अनेक महत्त्वाची स्थळे आहेत. त्यांच्या सुरक्षेसाठी पालिकेचे अडीच हजार व खासगी ५०० असे सुमारे सव्वातीन हजार सुरक्षा रक्षक तैनात आहेत. गेट वे ऑफ इंडिया, रुग्णालये, शाळा, चौपाटय़ा, तलाव आदींचा त्यात समावेश आहे. या ठिकाणी अतिरेकी हल्ला होऊ शकतो. त्यामुळे पालिकेच्या सुरक्षा रक्षकांना प्रशिक्षण देऊन तयार केल्यास संभाव्य हल्ले रोखले जाऊ शकतील, असा पोलिसांचा विश्वास आहे. मुंबई पोलिसांचे बीडीडीएस (बॉम्बशोधक आणि बॉम्बनाशक पथक) तसेच संरक्षण शाखेचे तज्ज्ञ पोलीस हे प्रशिक्षण देणार आहेत. पालिका आयुक्त आणि मुंबई पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या अलीकडेच झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यासंदर्भात अतिरिक्त पोलीस आयुक्त (संरक्षण) मधुकर पांडे यांनी सांगितले की, पालिकेच्या सुरक्षा रक्षकांना जर अतिरेकीविरोधी कारवाईचे प्रशिक्षण दिले तर पोलिसांनाही मोठी मदत होईल. हे सुरक्षा रक्षक प्रशिक्षित झाल्यास शहराची सुरक्षा व्यवस्था अधिक मजबूत होईल. मुंबई महापालिकेच्या इतिहासात प्रथमच अशाप्रकारे पोलिसांकडून सुरक्षा रक्षकांना प्रशिक्षण दिले जाणार आहे.
दरम्यान, या स्थळांच्या सुरक्षेसाठी मुंबई पोलिसांनीही एक सुरक्षा योजना तयार केली आहे. परिमंडळ १ चे उपायुक्त डॉ. रवींद्र शिसवे, परिमंडळ २ चे उपायुक्त निसार तांबोळी, अतिरिक्त पोलीस आयुक्त मधुकर पांडे आणि अतिरिक्त पोलीस आयुक्त प्रवीण साळुंखे यांनी याबाबतची योजना तयार केली असून त्याचे सादरीकरण या बैठकीत करण्यात आले. मात्र या योजनेचा तपशील गोपनीय ठेवण्यात आला आहे.
सुरक्षारक्षक सुसज्ज केव्हा होणार?
२६१८ पालिकेचे आणि सुमारे ५०० खासगी असे सव्वातीन हजार सुरक्षा रक्षकांचे पालिकेचे सुरक्षा दल शस्त्रास्त्रे आणि अन्य साधनसामग्रीच्या नावे अगदीच दुबळे आहे. सुरक्षादल असे नाव असले तरी या दलाचीच सुरक्षा करण्याची गरज आहे. पालिकेच्या २६१८ सुरक्षारक्षकांकडेमिळून अवघी १०० रिव्हॉल्वर आणि १५० रायफली एवढाच शस्त्रसाठा आहे. आणि त्यातही ५० रिव्हॉल्वर आणि ५० रायफली नादुरुस्तच आहेत. वास्तविक सुरक्षा दलासाठी ३,८१८ पदे मंजूर करण्यात आली आहेत. परंतु त्यातील तब्बल १२०० पदे रिक्तच आहेत. अपुरे मनुष्यबळ आणि शस्त्रसाठा असलेल्या सुरक्षा रक्षक दलाचे आधुनिकीकरण करण्याची घोषणा दरवर्षी सुरक्षा दल स्थापना दिनी केली जाते. आणि नेहमीप्रमाणेच या घोषणा हवेतच विरतात. या सुरक्षा दलाच्या आधुनिकीकरणासाठी १९८३ मध्ये जी. डब्ल्यू शिवेखर समिती, १९९२-९३ मध्ये एस. डी. सोमण समिती, २०१० मध्ये त्यागी समितीने आपापले अहवाल प्रशासनाकडे सादर केले. तसेच पालिकेचे तत्कालीन अतिरिक्त आयुक्त राममूर्ती आणि तत्कालीन सुरक्षा अधिकारी डावरे यांनी १९८५ मध्ये सिक्युरिटी मॅन्युअल तयार केले. परंतु हे सगळे बासनातच पडून आहे.

काही उपाय
* बोगस सिमकार्ड वापरल्यास दाखल होणार गुन्हे
* खोटी कागदपत्रे सादर करून सिमकार्ड घेतल्यास कारवाई
* भाडय़ाने घर देण्यापूर्वी पोलिसांचे ‘ना हरकत प्रमाणपत्र’ बंधनकारक
* हॉटेल, लॉजेसची नियमित तपासणी
* कोम्बिंग ऑपरेशनमध्ये वाढ
* विविध ठिकाणी मॉकड्रीलचे आयोजन
* जनजागृतीसाठी नागरिकांना एसएमएस पाठवणार
* शहरभर भित्तीपत्रकांद्वारे जनजागृती