भ्रष्टाचारात बरबटलेल्या काँग्रेस-राष्ट्रवादीला चाबकाने फोडण्याची वेळ आली आहे. जनतेचा विश्वास नसल्याने शरद पवारांना राज्यसभेचा मार्ग स्वीकारावा लागला आहे. भ्रष्ट अजित पवारांनी बीड मतदारसंघामध्ये उभे राहून दाखवावे, असे आव्हान भाजपाचे उपनेते खासदार गोपीनाथ मुंडे यांनी इचलकरंजी येथे झालेल्या महायुतीच्या महासभेत गुरूवारी बोलतांना केले.
या सभेच्या माध्यमातून महायुतीने पश्चिम महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले. उध्दव ठाकरे, गोपीनाथ मुंडे यांच्यासह महायुतीच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत झालेली पहिलीच सभा यशस्वी ठरली. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी व राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी एकत्रित राहण्याचा संकल्प करून दाखविल्याने माढा मतदारसंघाबद्दल महायुतीमध्ये निर्माण झालेला पेच बऱ्याचअंशी सुटल्याचे या सभेत स्पष्ट झाल्याने सर्वांचे चेहरे उजळले.     
लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेना-भाजपा-स्वाभिमानी शेतकरी संघटना-रिपब्लिकन पक्ष आठवले गट व राष्ट्रीय समाज पक्ष यांनी एकत्रित येण्याचा निर्धार केला आहे. या महायुतीची पहिली सभा गुरूवारी इचलकरंजीतील थोरात चौकात झाली. पाचही पक्षांच्या वक्तयांनी काँग्रेस आघाडी सरकारच्या भ्रष्ट कारभाराचा पंचनामा केला. स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून भेट स्वरूपात देण्यात आलेल्या आसूडाचा उल्लेख करीत त्याचा फटका देऊन आघाडी सरकारला सत्तेतून हाकलून लावण्याचा निर्धार बोलून दाखविण्यात आला. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस म्हणाले,‘‘घोटाळेबाज आघाडी सरकारला दूर करायचे की महायुतीचे जिगरबाज लोक निवडून आणायचे याचा एकमेव निर्णय करण्याची वेळ आता आली आहे. सिंचन घोटाळा करणाऱ्या अजित पवारांनी सर्व पैसा घरात नेल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले आहेत. भ्रष्टाचार करणाऱ्या आघाडीच्या सर्व मंत्र्यांना युतीची सत्ता आल्यानंतर जेलमध्ये टाकण्यात येईल.’’ एलबीटी, वीज, टोल हे प्रश्न महायुती सोडवून दाखवेल असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.    
शिवसेनेचे नेते सुभाष देसाई यांनी महायुतीची सभा ही विजयाची नांदी आहे, असा उल्लेख करीत राज्यातील आघाडी शासनावर टीकेची झोड उठविली. आघाडी सरकारची ‘बी’ टीम असलेल्या मनसेला टोलनाके फोडण्यास लावले तरीही राज्यातील टोल अजूनही सुरू आहेत. याकडे लक्ष वेधून टोलनाके फोडणाऱ्यांवर कारवाई झालेली नाही. हा प्रकार म्हणजे ‘वरून कीर्तन आतून तमाशा’ असा आहे. आघाडी सरकार व मनसेचे साटेलोटे असले तरी जनता त्याला थारा देणार नाही.    
बहुचर्चित माढा मतदारसंघाचा उल्लेख करून महादेव जानकर म्हणाले,की राजू शेट्टी व माझ्यामध्ये कधीच भांडण नाही. पवार काका-पुतण्याला खतम करण्यासाठी आम्ही दोघे एकत्र आलो आहोत. ठाकरे-मुंडे यांनी माढा मतदारसंघाचा योग्य तो निर्णय घ्यावा. माझा राष्ट्रीय समाज पक्ष महायुतीसमवेत असेल. मरेपर्यंत महायुतीची साथ सोडणार नाही. काँग्रेस-राष्ट्रवादीला हद्दपार केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही.    
विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांनी राजू शेट्टी यांच्या तगडय़ा उमेदवारीसमोर विरोधक कसे हतबल होत आहेत यावर भाष्य केले. ते म्हणाले, कल्लाप्पाण्णा आवाडे आता उमेदवारी नको म्हणत आहेत, तर जयंत पाटील मागे सरत चालले आहेत. गतवेळी साडेचार लाख मते मिळविणारे शेतकऱ्यांचे नेते राजू शेट्टी यंदा १० लाख मते घेऊन विजयी होतील. महायुतीला पांडवांचे नेतृत्व लाभले असल्याने काँग्रेस-राष्ट्रवादीरूपी कौरव सेनेचा निपात होणार आहे.
खासदार राजू शेट्टी यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या मंत्र्यांनी सहकार क्षेत्रात केलेल्या भ्रष्टाचाराचा पंचनामा केला. सहकारी संस्था खाऊन संपविल्याने आता खाण्यासाठी काहीच नसलेले सरकारातील मंत्री वीज व कोळसा खात सुटले आहेत. शरद पवार महाआघाडीत घुसण्याचा प्रयत्न करीत असले तरी त्यांना अजिबात थारा देवू नका. पंचतारांकित औद्योगिक वसाहतीत कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांची चिठ्ठी दिल्याशिवाय नोकरी दिली जात नाही. सदाभाऊ खोत यांच्यावर भ्रष्टाचाराबद्दल कारवाई होत असेल तर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या कागल शाखेत २ कोटी ८० लाख रूपयांची हातशिल्लक गायब करणाऱ्या हसन मुश्रीफांवर कारवाई का होत नाही, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. महाराष्ट्र नांगरून काँग्रेस-राष्ट्रवादीचे तण काढल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असा निर्धार त्यांनी बोलून दाखविला.