ठाणे शहरातील वेगवेगळ्या भागांतील रस्त्यांसह रेल्वे स्थानक परिसरात अनधिकृतपणे बसणाऱ्या फेरीवाल्यांविरोधात कारवाई केली तर फेरीवाला संघटना न्यायालयात अवमान याचिका दाखल करतात. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार शहरात फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी होत नाही, तोपर्यंत फेरीवाल्यांवर कारवाई करणे शक्य नाही, अशी हतबलता दस्तुरखुद्द महापालिका आयुक्त असीम गुप्ता यांनी शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली. तसेच रेल्वे स्थानक परिसर, सॅटीस पूल आणि शहरातील मोक्याच्या ठिकाणी नव्याने वाढणाऱ्या फेरीवाल्यांवर कारवाई करता येऊ शकते का, याची चाचपणी करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, आयुक्त गुप्ता यांच्या भूमिकेमुळे शहरात आणखी काही महिने फेरीवाला राज कायम राहण्याची चिन्हे दिसून येत आहेत.
ठाणे शहरातील तलावांचे परिसर, मोक्याची ठिकाणे आदी भागांतील रस्ते तसेच पदपथ अडवून फेरीवाल्यांनी आपले बस्तान मांडले आहे. ठाणे स्थानक परिसर तसेच सॅटीस पुलावरही फेरीवाल्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढू लागले आहे. त्यामुळे नागरिकांना या भागातून प्रवास करणे कठीण झाले आहे. असे चित्र असतानाही फेरीवाल्यांवर महापालिका प्रशासनाकडून कोणतीही कारवाई होताना दिसून येत नाही. तत्कालीन आयुक्त आर. ए. राजीव यांनी रेल्वे स्थानक परिसर आणि सॅटीस पूल फेरीवालामुक्त केला होता. मात्र राजीव यांची बदली होताच या भागात फेरीवाले पुन्हा बसू लागले आहेत. त्यामुळे महापालिकेच्या कारभाराविषयी नागरिक फारसे समाधानी नसल्याचे चित्र आहे.
या संदर्भात शुक्रवारी पत्रकार परिषदेत आयुक्त असीम गुप्ता यांना पत्रकारांनी विचारले असता, त्यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळे कारवाई करता येत नसल्याचे स्पष्ट केले. फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी करण्यात येत नाही, तोपर्यंत फेरीवाल्यांवर कारवाई करू नये, असे सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिले आहेत. त्यामुळे फेरीवाल्यांवर कारवाई करता येत नाही. त्यामुळे शहरात फेरीवाला धोरण राबविण्यासाठी फेरीवाल्यांच्या नोंदणीचे काम सुरू आहे, असे त्यांनी सांगितले. असे असले तरीही शहरातील मोक्याची ठिकाणे, रेल्वे स्थानक परिसर तसेच सॅटीस पुलावर वाढणाऱ्या फेरीवाल्यांवर कारवाई करता येईल का, याची चाचपणी करण्यात येईल आणि वर्षांनुवर्षे त्या ठिकाणी कार्यरत असलेल्या अतिक्रमण विभागातील कर्मचाऱ्यांची बदली करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.