महानगरपालिकेच्या प्रभाग रचनेची कामे गोपनीय स्वरूपात झालेली नाहीत. या गंभीर प्रकरणाचे पुरावे आपल्याकडे असून तत्कालीन आयुक्त जीवन सोनवणे यांनी यात संशयास्पद भूमिका निभावल्याचा आरोप लोकसंग्राम पक्षाचे नगरसेवक कैलास हजारे यांनी केला आहे. प्रभाग रचना प्रक्रियेतील अधिकाऱ्यांची चौकशी करावी, दोषी अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी आणि नव्याने प्रभाग रचना करावी, अशा मागण्या त्यांनी केल्या आहेत.
हजारे यांनी राज्य निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांच्याकडेही लेखी स्वरूपात तक्रार केली आहे. राज्य निवडणूक आयोगाला नि:पक्षपातीपणे काम करता यावे म्हणून घटनेने स्वायत्तता प्रदान केली आहे. प्रभाग रचनेची माहिती आयोगाच्या  आदेशाआधीच जाहीर झाल्यास राजकीय व्यक्तींकडून त्यांच्या प्रभागाची रचना सोयीची होण्याबाबत दबाव येऊ शकतो. हे लक्षात घेऊन निवडणूक आयोगाने सर्व महापालिकांना प्रभाग रचनेचे कामकाज गोपनीय स्वरूपात हाताळण्याचे आदेश २४ ऑक्टोबर २००५ आणि दोन जुलै २०१३ रोजी दिले आहेत.
९ एप्रिल २०१३ च्या आदेशानंतर तत्कालीन आयुक्तांनी प्रभाग रचनेचे कामकाज सुरू करण्याआधी नगररचना विभागातील निवडक अधिकारी-कर्मचारी यांची बैठक घेतली. काही अधिकारी व कर्मचाऱ्यांवर याबाबतच्या कामकाजाची जबाबदारी सोपविली. याची माहितीही तत्कालीन आयुक्तांनीच माध्यमांना दिल्याचेही हजारे यांनी म्हटले आहे. प्रभाग रचनेचे कामकाज पूर्ण करून प्रभाग रचना अंतिम मंजुरीसाठी निवडणूक आयोगाकडे पाठविण्यात आल्याची माहितीही सोनवणे यांनी नगरसेवक व माध्यमांना स्वत: दिली असून या सर्व बाबी गंभीर असल्याचे हजारे यांनी म्हटले आहे.