नागपूर लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार विद्यमान खासदार विलास मुत्तेमवार यांचे प्रचार कार्यालय समजून त्यांच्या चिरंजीवांच्या ग्रेट नाग रोडवरील कार्यालयावर निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाने अचानक धडकून झडती सुरू केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. या झडतीत ५ लाख ७० हजार ८०० रुपये सापडले. नरेंद्र मोदी व नितीन गडकरींच्या इशाऱ्यावरूनच हा तमाशा झाला असून गुजरातहून आलेल्या अधिकाऱ्याला निलंबित करण्याची मागणी निवडणूक आयोगाकडे करणार असल्याचे मुत्तेमवार म्हणाले.
विलास मुत्तेमवार यांच्या मालकीचे आधी या जागेवर वृत्तपत्राचे कार्यालय होते. वृत्तपत्र बंद झाले असून आता या इमारतीत त्यांच्या चिरंजीवांचे ‘व्हीआरएस इन्फ्रास्ट्रक्चर्स’ हे कार्यालय असून मागे छापखाना आहे. येथे पैसे वाटप सुरू असल्याच्या माहितीवरून गुरुवारी मध्यरात्रीनंतर सव्वाबारा वाजताच्या सुमारास नागपूर लोकसभा मतदारसंघाचे निरीक्षक दिलीप पनसाली त्यांच्या नेतृत्वाखालील भरारी पथक मोठय़ा पोलीस ताफ्यासह धडकले. यावेळी हे कार्यालय बंद होते. रखवालदाराला या पथकाने किल्ली मागितली. रखवालदाराने किल्ली नसल्याने असमर्थता व्यक्त केली. त्यामुळे या परिसरात रात्री पोलिसांचा पहारा बसविण्यात आला. येथे पोलीस पोहोचल्याचे रात्रीच काँग्रेस कार्यकर्त्यांना समजल्याने कार्यकर्त्यांची गर्दी जमली होती.
आज सकाळी दहा वाजता स्वत: विलास मुत्तेमवार, गीतेश व विशाल हे त्यांची दोन मुलगे, शहर काँग्रेस अध्यक्ष विकास ठाकरे, आमदार दीनानाथ पडोळे, शेख हुसेन, बिज्जू पांडे, आभा पांडे, प्रशांत धवड, विठ्ठल कोंबाडे, कमलेश समर्थ, अनिल वडपल्लीवार यांच्यासह काँग्रेसचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते आले होते. दुपारी ज्येष्ठ नेते उल्हासदादा पवार आले. ग्रेट नाग रोडवर कार्यकर्त्यांचा जमाव जमल्याने येथे मोठा पोलीस ताफा तैनात करावा लागला. निवडणूक आयोगाचे नोडल अधिकारी संजय देशपांडे व अजय रामटेके यांच्यासह पथक आले. प्राप्तिकर खात्याचे अधिकारीही आले. भरारी पथकाला कार्यालय उघडून देण्यास मुत्तेमवार यांनी मज्जाव केला. काल रात्री आलेल्या अधिकाऱ्यांनी येथे यावे, असा आग्रह त्यांनी धरला. देशपांडे यांनी निवडणूक आयोगाचे निरीक्षक दिलीप पनसाळी यांच्या भ्रमणध्वनीवर संपर्क साधला. यावेळी मुत्तेमवार यांनी संतप्त भावना व्यक्त केल्या.
कालच्या प्रमाणे तुम्ही आल्यासच कार्यालय उघडण्याची तयारी दर्शविली. दुपारी पाऊण वाजता सहायक निवडणूक अधिकारी राहुल रेखावार आले. त्यांनी विलास मुत्तेमवार यांच्याशी चर्चा केल्यानंतर झडती सुरू झाली. झडतीची कार्यपद्धती त्यांनी मुत्तेमवार यांना समजावून सांगितली. त्यानंतर झडती सुरू झाली. सायंकाळी साडेपाच वाजता झडती थांबली. आमची कारवाई संपलेली नसून ती पूर्ण होताच निवडणूक आयोगाकडे अहवाल सादर केला जाईल, असे या सहायक निवडणूक अधिकारी राहुल रेखावार यांनी माध्यमांना सांगितले.
या झडतीचे वृत्त नागपूरसह सर्वत्र पसरले. शहरात सर्वत्र चर्चा आणि अफवांनाही जोर आला होता. कार्यकर्त्यांनी प्रचार सोडून मुत्तेमवारांच्या ग्रेट नाग रोडवरील कार्यालयाकडे धाव घेतली. महिला-पुरुष कार्यकर्त्यांच्या व त्यांच्या वाहनांच्या गर्दीमुळे ग्रेट नागरोडवरील वाहतुकीचा खोळंबा होत असल्याने वाहतूक पोलिसांनाही तैनात करावे लागले. सायंकाळी पथकाने समोर उभ्या एका प्रचार वाहनाची तपासणी केली. त्यात काहीच आढळले नाही. या दरम्यान, काही कार्यकर्ते संतप्त झाल्याने तणाव निर्माण झाला होता.

मोदी व गडकरींच्या इशाऱ्यावरून.. -मुत्तेमवार
विलास मुत्तेमवार यांनी नरेंद्र मोदी नितीन गडकरी यांच्या इशाऱ्यावरून आजचा तमाशा झाल्याचा आरोप केला. काही माध्यमांवर छापा घातल्याच्या कारवाईच्या वृत्ताबद्दल विलास मुत्तेमवार यांनी नापसंती व्यक्त केली. हा छापा नाहीच. हे आमचे प्रचार कार्यालय नाही. येथे मुलाच्या व्यवसायाचे कार्यालय आहे. याशिवाय, या इमारतीत दोन वृत्तपत्रे, बँक, तसेच एका प्रतिष्ठानाचे कार्यालय आहे. उमेदवाराला कुठलीही सूचना न देता झडती कशी काय होऊ शकते? ज्या पद्धतीने निवडणूक निरीक्षक येथे आले ती पद्धतच संताप आणणारी आहे. उमेदवाराला (मुत्तेमवार) सूचनाही दिली गेली नाही. साध्या ‘एसएमएस’वर झडती घेता? नितीन गडकरींच्या कार्यालयाची झडती का घेत नाही, असा सवाल विलास मुत्तेमवार यांनी केला. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण नागपुरात आहेत. उद्या सोनिया गांधी येणार आहेत. त्यामुळे वातावरण काँग्रेसमय झाले आहे. गडकरींना पराभव दिसत असल्याने ते बावचळले आहेत. त्यांच्या वाडय़ावरून रोज पैसे वाटले जात आहेत. रोज जेवणावळी सुरू आहेत, वाहनांचा ताफा फिरत आहे, शंभर कोटी रुपये खर्च केला आहे, त्याचा हिशेब का घेतला जात नाही? त्यांच्या वाडय़ाची झडती का घेतली जात नाही, असा सवाल मुत्तेमवार यांनी केला.
काल रात्री येथे आलेले निरीक्षक पनसाळींनी २-४ कोटी रुपये सोबत आणले होते आणि ते येथे टाकून मोठी रक्कम सापडल्याचा देखावा करीत बदनाम करण्याचा कट आखण्यात आला होता. आमच्या कार्यकर्त्यांच्या विरोधामुळे तो सफल होऊ शकला नाही. मुळात दहा लाखांपेक्षा कमी रक्कम जप्त करता येत नाही. कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी आणलेले पाच लाख रुपये सापडले तरी त्यांनी जप्त   कसे केले, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. हा पूर्वनियोजित कट असल्याचा आरोप त्यांनी केला.