सभागृहाबाहेर सत्ताधा-यांच्या कारभाराचा विरोधकांनी केलेला निषेध आणि सभागृहात सत्ताधाऱ्यांच्या समर्थकांनी विरोधकांचा केलेला निषेध, अशा वातावरणात जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेची ९४ वी वार्षिक सभा आज झाली. विरोधकांचा सभेवरील बहिष्कार व नागपंचमीचा सण यामुळे सभेस दरवर्षीच्या तुलनेत सभासदांची उपस्थिती कमीच होती. तरीही सत्ताधाऱ्यांच्या समर्थकांनी ‘सर्व विषय मंजूर’चे फलक सभागृहात फडकावलेच.
हे प्रकार वगळता, दरवर्षी गदारोळाची परंपरा असलेली शिक्षक बँकेची सभा यंदा मात्र शांततेत झाली. सभेत सत्ताधाऱ्यांच्या समर्थकांनी कामकाजाबद्दल सूचना करताना हरकत मात्र कोणी व्यक्त केली नाही. बँकेचे अध्यक्ष चांगदेव ढेपले यांच्या अध्यक्षतेखाली सभा यशवंतराव चव्हाण सहकार सभागृहात सकाळी झाली. सभा सुरु झाल्यावर विरोधकही निघुन गेले. सभा शांततेत झाल्याचे श्रेय घेण्याचा प्रयत्नही दोन्ही बाजूंकडून झाला. बँक संचालकांच्या विरोधात सदिच्छांसह सर्वच प्रमुख विरोधी मंडळे एकवटली व त्यांनी सभेवर बहिष्कार टाकला होता. काही दिवसांपासून होत असलेल्या आरोप-प्रत्यारोपांमुळे यंदाही सभेत शिक्षक सभासद गोंधळ घालण्याच्या शक्यता होती, त्यासाठी पोलीस बंदोबस्तही तैनात होता. परंतु यंदा त्यात खंड पडला.
सभा सुरु होण्यापूर्वी विरोधी सदिच्छा, गुरुकुल, ऐक्य, पुरोगामी-ऐक्य, ईब्टा आदी मंडळांनी बँक संचालक, त्यांचे श्रेष्ठी यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत भ्रष्ट कारभाराचा निषेध केला. संचालकांच्या विरोधात ‘शिक्षक बँकेची नागपंचमी-डोम्या नाग व वीस सापांची पिलावळ, पिते शिक्षक बँकेचे दूध’ असा विडंबनात्मक फलक फडकावण्यात आला. त्यावर संचालकांना अनाकोंडा, कोब्रा, अजगर, फुरसे, नाग, साप अशा उपाधी लावण्यात आल्या होत्या. संजय धामणे, अनिल आंधळे, नितीन काकडे, कल्याण राऊत, संजय काळे, आबा लोंढे यांच्यासह शिक्षक सभासद आंदोलनात सहभागी झाले होते. पोलीसांनी त्यांना अडवल्याने सभासदांनी त्यांच्याशी हुज्जतही घातली.
सभेत बोलताना अध्यक्ष ढेपले यांनी, अहवालावरच बोला, इतर विषयावर बोलायचे असेल तर मैदानात बोलू, असा इशारा दिला. पदवीधर शिक्षक मंडळ बहिष्कारात सहभागी नव्हते. मंडळाचे दिलीप दहिफळे, लक्ष्मण टिमकरे यांच्यासह सदिच्छाचे पारनेर तालुकाध्यक्ष कारभारी बाबर, रवि पिंपळे, सुभाष खेमनर, संजय त्रिभुवन, तानाजी गवळी, बबन गाडेकर, मच्छिंद्र धस आदींनी कारभाराबाबत विविध सूचना केल्या. सूचना करताना बहुतेक सभासद विरोधकांचा निषेध करत गोंधळी बाहेर राहिल्याने सभा शांततेत होत असल्याचा दावा करत होते.
 बँकेचा श्वास मोकळा
रिझव्‍‌र्ह बँकेच्या बंधनातून शिक्षक बँक आता मोकळा श्वास घेऊ शकते आहे, असे सांगून अध्यक्ष ढेपले यांनी कर्जमर्यादा १ लाख रुपयांनी वाढवण्याची, आजारपणासाठी २० हजार रुपयांपर्यंत कर्ज देण्याची व ४ लाख रुपयांच्या अपघात विम्यासाठी १०० रुपये कपात जाहीर केली.