वर्षभरात १७० भरकटलेली मुले पुन्हा घरटय़ात परतली

कुणाला हिरो व्हायचे होते..कुणाला गायक तर कोणी चक्क भाई व्हायचे म्हणून घरातून निघून मुंबईच्या मायानगरीत दाखल झाला.

कुणाला हिरो व्हायचे होते..कुणाला गायक तर कोणी चक्क भाई व्हायचे म्हणून घरातून निघून मुंबईच्या मायानगरीत दाखल झाला. काही दिवसांतच आपण चुकल्याची जाणीव झाली..पण घरी कोणत्या तोंडाने परत जायचे म्हणून मायानगरीत अडकले. कालांतराने बालगृहात रवानगी झाली..महिने उलटले, पण त्या उंच भिंतीपलीकडचे जग दिसेना. नियतीच्या दुष्टचक्रात अडकलेल्या अशा १७० मुला-मुलींना ‘माय होम इंडिया’च्या प्रयत्नांमुळे गेल्या वर्षभरात पुन्हा आपल्या घरटय़ात परतण्याची संधी मिळाली आहे.
ईशान्येकडील राज्यांमधील सामाजिक कार्यासाठी स्थापन झालेली ‘माय होम इंडिया’ त्या राज्यांतील काही मुली बालगृहात आल्यामुळे घर सोडून पळालेल्या मुलांना पुन्हा पालकांपर्यंत पोहोचवण्याच्या कामात गेल्या वर्षी कार्यरत झाली. बघता बघता मुंबईतील प्रामुख्याने डोंगरी बालगृहातील तब्बल १७० मुला-मुलींना पुन्हा घरच्यांपर्यंत पोहोचवण्यात संस्थेला यश आले. त्यातील तब्बल ७४ मुले-मुली आसाम, मेघालय आदी ईशान्येकडील राज्यांतील आहेत. त्यानंतर क्रमांक लागतो तो उत्तर प्रदेशचा. तेथील ३२ मुलांना घरी पाठवण्यात यश आले आहे. पुढच्या काही दिवसांत आणखी ४२ मुला-मुलींना त्यांच्या घरी पाठवण्यात येत असून त्यातील बहुतांश उत्तर प्रदेशमधील आहेत.
आता संस्थेने या प्रकल्पाला ‘सपनों से अपनों तक’ असे नाव दिले असून ‘सारस्वत बँके’चे दिवंगत अध्यक्ष एकनाथ ठाकूर यांना तो समर्पित केला आहे. या प्रकल्पाचे औपचारिक उद्घाटन शनिवार ७ मार्च रोजी सायंकाळी सावरकर स्मारकाच्या सभागृहात होत आहे. प्रमुख पाहुण्या म्हणून महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे उपस्थित राहणार आहेत. मानसोपचारतज्ज्ञ डॉ. हरीश शेट्टी यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या कार्यक्रमात राज्यमंत्री विद्या ठाकूर, एकनाथ ठाकूर यांचे पुत्र गौतम ठाकूर हे उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती ‘माय होम’चे संस्थापक सुनील देवधर यांनी दिली.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: My home india project successfully return back 170 childrens to their homes