महापालिकेतील सत्ताधा-यांच्या अपयशी कारभाराचा पंचनामा प्रभागात मांडण्याची मोहीम काँग्रेस कार्यकर्त्यांनी सुरू करावी, असे आवाहन करतानाच कृषिमंत्री राधाकृष्ण विखे यांनी सध्याच्या नेतृत्वाने ‘शहराचे स्वास्थ्य बिघडवल्याची’ टीकाही केली. आगामी मनपा निवडणुकीच्या पार्श्र्वभूमीवर काँग्रेस कार्यकर्त्यांना सक्रिय करण्यासाठी विखे यांनी आज शहरात विविध ठिकाणी बैठका घेतल्या, त्या वेळी ते पक्ष कार्यालयातील कार्यक्रमात बोलत होते.
माजी नगरसेवक व शहर बँकेचे संचालक आसाराम कावरे यांनी आज सायंकाळी माळीवाडा वेशीजवळ विखे यांच्या उपस्थितीत झालेल्या जाहीर मेळाव्यात पुन्हा पक्षात प्रवेश केला. पक्षाचे जिल्हाध्यक्ष जयंत ससाणे यांच्या पुढाकाराने झालेल्या या कार्यक्रमास पक्षातील थोरात गटाचे प्रमुख पदाधिकारी अनुपस्थित राहिले. विखे यांनी त्यापूर्वी नगरसेवक निखिल वारे व बाळासाहेब पवार यांच्या प्रभागातही मेळावा घेतला.
मनपा निवडणुकीसाठी लवकरच प्रभागरचना जाहीर होईल त्यावर हरकती घेण्यासाठी, जातपडताळणीसाठी, जाहीरनामा तयार करण्यासाठी समित्या स्थापन करण्याची, मागील निवडणुकीतील पराभूत उमेदवार, सध्याचे इच्छुक व विद्यमान नगरसेवकांची एकत्रित बैठक बोलवण्याची सूचना तसेच आगामी निवडणुकीस सामोरे जाण्यासाठी कार्यपद्धती काय असावी याची‘ब्लू प्रिंट आवाहननही त्यांनी केले.
माळीवाडा येथील सभेत विखे यांनी शहरात परिवर्तन अटळ असल्याचे सांगितले. शहरातील आमदार, सत्ताधारी शहरास ऐतिहासिकच ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत, गेल्या अनेक वर्षांत येथे नवीन सुधारणा त्यांना करता आला नाही, शहर विकासाचा प्रयत्नच मनपाच्या सत्ताधा-यांकडून येथे होताना दिसत नाही, त्यामुळे जिल्ह्य़ातील संगमनेर, श्रीरामपूर, शिर्डीसारखी छोटी शहरेही नगरशी स्पर्धा करताना दिसतात. कोणतीही संधी दिसत नसल्याने शहराचे आर्थिक, सामाजिक स्वास्थ्य बिघडवले आहे. शहरातील नेतृत्वाने, आमदारांनी अपेक्षाभंगच केला आहे, मनपामध्ये केवळ ठेकेदारांनाच जोपासण्याचे काम होताना दिसते, अशी टीकाही त्यांनी केली.
जिल्ह्य़ाचा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी सर्वाची एकत्रित बैठक घेणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले. या वेळी शहर जिल्हाध्यक्ष ब्रीजलाल सारडा, जयंत ससाणे, विनायक देशमुख, अनंत देसाई, उबेद शेख, बाळासाहेब भुजबळ, सविता मोरे आदी उपस्थित होते.