अखिल भारतीय मराठी नाटय़ परिषद, शिखर परिषदेच्या निवडणुकीत नगरचे दोन मोहरे उतरले आहेत. परिषदेच्या नगर शाखेचे संस्थापक सतीश लोटके व संगमनेर शाखेचे संजय दळवी हे दोघे नाशिक विभागातून परिषदेच्या मुख्य नियामक मंडळाच्या सदस्यपदासाठी नशीब अजमावत आहेत.
नियामक मंडळाच्या एकूण ३८ जागा असून त्यांची मुंबई-१६, पुणे-६, नाशिक-४, बीड-२, नागपूर-५ (याप्रमाणे अन्य विभाग) अशी विभागणी करण्यात आली आहे. त्या त्या विभागातील परिषदेचे सदस्य असलेले मतदार त्यांचे प्रतिनिधी नियामक मंडळासाठी निवडून देतील व नंतर मग त्यांच्यातून पदाधिकारी निवडले जातील.
लोटके व दळवी नाशिक विभागातून वेगवेगळ्या पॅनेलमधून निवडणूक लढवत आहेत. लोटके यांनी राजेंद्र जाधव, सुनिल ढगे (नाशिक) व श्रीपाद जोशी यांना बरोबर घेत ४ जणांचे स्वतंत्र सिद्धीविनायक नावाचे पॅनेल तयार केले आहे. नियामक मंडळाचे यापूर्वीचे अध्यक्ष, प्रसिद्ध अभिनेते मोहन जोशी यांनी नाशिक विभागात या पॅनेलला जाहीर पाठिंबा दिला आहे. लोटके यांनी सांगितले की पॅनेल स्वतंत्र असले तरी आम्ही जोशी यांच्या विचारांशी सहमत आहोत.
दळवी प्रसिद्ध अभिनेते विनय आपटे यांच्या पॅनेलमधून उभे आहेत. जातेगावकर, जुन्नरे, गायधनी हे त्यांचे सहकारी आहेत. नाशिक विभागात परिषदेचे एकूण १ हजार ९३३ मतदार आहेत. त्यात नगर शाखेचे ३१९ जण असून त्यामध्ये राहुरी, कोपरगाव येथील रंगकर्मीही सदस्य आहेत. दळवी ज्या शाखेकडून उभे आहेत त्या संगमनेर शाखेचे ६८ सदस्य असून जिल्ह्य़ातीलच शेवगाव या शाखेचे ५० सदस्य (अध्यक्ष-उमेश घेवरीकर) आहेत.
जिल्ह्य़ातील हे ४३७ व नाशिक शाखेचे १ हजार ४९६ सदस्य नाशिक विभागाचे मतदार आहेत. लोटके गेली अनेक वर्षे हौशी रंगभूमीवर कार्यरत असून नगरला नाटय़संमेलन आयोजित करण्यात त्यांचा फार मोठा सहभाग होता. परिषदेची नगरची शाखाही त्यांच्यामुळेच स्थापन झाली असून त्या माध्यमातून गेली काही वर्षे ते मुंबईत शिखर परिषदेतही कार्यरत आहेत.
दळवी हेही मूळचे नगरचेच असून संगमनेर महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. तेही नगरच्या रंगभूमीवर व नंतर संगमनेरमध्ये नाटय़चळवळीशी संबंधीत काम करत असतात. परिषदेच्या मध्यवर्ती कार्यकारिणीची निवडणूक नगरमधून लढवणारे लोटके व दळवी पहिलेच आहेत. जिल्ह्य़ाला शिखर परिषदेत प्रतिनिधीत्व मिळाले पाहिजे अशी त्यांची
भावना आहे.
टपालाद्वारे मतदान
मतदान टपालाद्वारे होते. मतदारांना साधारण २२ जानेवारीपर्यंत मतपत्रिका टपालाने मिळतील. त्यांनी त्या मध्यवर्ती शाखेच्या कार्यालयात १७ फेब्रुवारीपर्यंत पाठवायच्या आहेत. सायंकाळी ७ वाजेपर्यंत पोहोचणाऱ्या मतपत्रिका स्वीकारल्या जातील. त्यानंतर लगेचच तिथेच मतमोजणी होऊन निकाल जाहीर केला जाणार आहे.