हिमालयाकडून येणाऱ्या थंड व कोरडय़ा वाऱ्यांमुळे अवघा महाराष्ट्र गारठला असताना, एरवी तापमानाचा उच्चांक नोंदवणाऱ्या विदर्भाने यावर्षी मात्र निच्चांक नोंदवला आहे. ४६ वर्षांंपूर्वी आजच्याच तारखेला नागपूर शहराने ५.५ अंश सेल्सिअस तापमान नोंदवले होते, तर आज ते ५ अंश सेल्सिअस नोंदवण्यात आले आहे. तापमानाच्या निच्चांकाची ही पातळी आणखी दोन दिवस कायम राहणार असल्याचे नागपूर हवामान खात्यातील सूत्रांनी सांगितले.
जागतिक पातळीवर गेल्या काही वर्षांत तापमानात होणाऱ्या चढउतारामुळे हवामानाचे चक्रसुद्धा बदलले आहे. ऑक्टोबरच्या मध्यात सुरू होणारी थंडी आता नोव्हेंबरच्या मध्यात सुरू होऊन जानेवारीपर्यंत कायम राहते. गेल्या वर्षीही थंडीला उशिरा सुरुवात होऊन फेब्रुवारीच्या पूर्वार्धापर्यंत ती कायम होती. अमेरिकेकडील हिम वादळे हिमालयाकडून चीनकडे सरकल्यानंतर तापमानात कमालीची घट व्हायला सुरू होते. उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहणाऱ्या या वाऱ्यांमुळे थंडीचा जोर वाढतो. राजस्थान, पंजाब, हरियाणात तापमान १ ते २ अंशापर्यंत जाऊन पोहोचते. विदर्भात ते ६, ७ आणि महाबळेश्वरला ते १ अंशापर्यंत जाते. मात्र, यावेळी नागपूरने महाबळेश्वरलाही मात दिली असून तापमान ५ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले आहे. ४६ वर्षांपूर्वी २९ डिसेंबर १९६८ ला ५.५ अंश सेल्सिअस एवढे तापमान नोंदवले होते. ४६ वर्षांनंतर आज त्याच दिवशी ५ अंश सेल्सिअस तापमान नोंदवण्यात आले आहे. अकोला येथे ७.१, अमरावती १०.२, बुलढाणा ९.४, ब्रम्हपुरी ९.२, वाशिम १२.६, वर्धा ७.४, यवतमाळ ७.८ इतकी कमी तापमानाची नोंद आज घेण्यात आली.
अमेरिका, तसेच उत्तर ध्रुवावरील देशांमध्ये सुरू असलेल्या हिमवादळाच्या परिणामामुळे यावर्षी २० डिसेंबरनंतरच भारतात खऱ्या अर्थाने थंडीला सुरुवात होईल, असे संकेत हवामानतज्ज्ञांनी दिले होते. ते तंतोतंत खरे ठरले असून तापमानाचा पारा ७ वरून ६ आणि ६ वरून ५ एवढा घसरला आहे. भौगोलिकदृष्टय़ा हिवाळ्यात तापमान १० अंशा सेल्सिअसपर्यंत असायला हवे, पण हिमवादळांच्या परिणामामुळे तापमानात प्रचंड घट झाली आहे. २०१० पासून उत्तर गोलार्धातील अमेरिका, सायबेरिया, चीन, रशियात हिमवादळांचे प्रमाण वाढत गेले. त्यामुळे हिमालयाकडून येणाऱ्या थंड व कोरडय़ा वाऱ्याचा परिणाम म्हणजे थंडीतील तापमानाचा निच्चांक आहे.
स्वातंत्र्यपूर्व काळात नागपूरने ७ जानेवारी १९३७ या दिवशी ३.९ अंश सेल्सिअस, तर स्वातंत्र्यानंतर ३ जानेवारी १९८३ ला ४.९ तापमान नोंदवले गेले. आज झालेली ५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद ६४ वर्षांंपूर्वी २ डिसेंबर १९५० ला ५ अंश सेल्सिअस एवढी होती. १० जानेवारी १८९९ मध्ये चंद्रपूर शहराचे तापमानसुद्धा २.८ अंश सेल्सिअस एवढे नोंदवण्यात आले होते.