भाजपचे वर्चस्व असलेल्या नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीची मतमोजणीला सिव्हील लाईनमधील प्रॉव्हिडन्स हायस्कूलच्या मैदानात उद्या, मंगळवारी सकाळी ८ वाजता होणार असला तरी अंतिम निकाल हाती येईपर्यंत रात्री उशिरापर्यंत उमेदवारांसह कार्यकर्त्यांंना वाट पहावी लागणार आहे. मतदानाची कमी झालेली टक्केवारी आणि मतदारांच्या अनुत्साहामुळे उमेदवारांसह विविध राजकीय पक्षातील पदाधिकाऱ्यांचीही उत्कंठा शिगेला पोहोचली आहे.
निवडणुकीत अनिल सोले (भाजप), बबन तायवाडे (काँग्रेस), किशोर गजभिये (अपक्ष) या तीन प्रमुख उमेदवारांशिवाय चंद्रकात गेडाम, महेंद्र निंबार्ते, पांडुरंग डबले, अर्चना महाबुधे, तीर्थराज हिरनखेडे, अमोल हाडके, नारायण पाटील, राजेंद्र लांजेवार, अब्दुल मजिज सिद्दिकी, गोरूल पांडे आणि राजेंद्र कराळे यांच्यासह १४ उमेदवार रिंगणात असले तरी खरी लढत ही भाजप-शिवसेना महायुतीचे प्रा. अनिल सोले आणि काँग्रेस-राष्ट्रवादीचे उमेदवार प्राचार्य बबन तायवाडे यांच्यात आहे. अपक्ष उमेदवार माजी सनदी अधिकारी किशोर गजभिये यांना बहुजन समाज पक्षाने पाठिंबा दिल्याने ते सुद्धा स्पर्धेत आहे. प्रॉव्हिडन्स हायस्कूलच्या मैदानात पोलिसांच्या कडक बंदोबस्तात सुरू होणाऱ्या मतमोजणीसाठी एकूण २४ टेबल लावण्यात आले आहे. सहा जिल्ह्य़ातील एकूण ३१७ मतदान केंद्रांवर १ लाख ७३ मतदारांनी मतदान केले. या सर्व मतांमधून प्रारंभी अवैध आणि नोटाची मते वेगळी केली जातील. त्यानंतर एकूण वैध मतांमधून विजयी मतांचा कोटा निश्चित केला जाईल. या सर्व प्रक्रियेला दुपारचे २ वाजण्याची शक्यता आहे. त्यानंतर मतमोजणीला प्रारंभ होईल. मतमोजणीसाठी ठेवण्यात येणाऱ्या २४ टेबलांवर प्रत्येकी एक हजार मतांची एकाच वेळी मोजणी होईल. त्यामुळे पहिल्या फेरीत २४ हजार मतांची मोजणी होईल.
एकूण झालेल्या मतदानांची टक्केवारी बघता सहा ते सात राऊंड होण्याची शक्यता असून या प्रक्रियेला किमान रात्री ९ वाजण्याची शक्यता असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी आप्पासाहेब धुळज यांनी सांगितले. मतमोजणी परिसरात आणि ज्या ठिकाणी मतपेटय़ा ठेवण्यात आल्या आहेत. त्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहे.
देशात सर्वत्र नरेंद्र मोदींच्या लाटेमुळे लोकसभा निवडणुकीत भाजपला यश मिळाल्यानंतर लगेच दीड महिन्यांनी झालेल्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत कोणत्या पक्षाला यश मिळेल, याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी या मतदारसंघातून चार वेळा विजयी झाले असून त्यापैकी एकदा अविरोध निवडून आले आहे. पदवीधर निवडणुकीत सर्वात कमी मतदान यावर्षी झाले आहे. त्यामुळे निकालाची टक्केवारी बघता कोणाला बहुमत मिळेल, हे सांगता येत नाही. निवडणुकीच्या काळात आरोप-प्रत्यारोपानंतर नेमका कुठला पक्ष बाजी मारतो हे कळणार आहे.
शिवाय, मतदारांची वाढलेली संख्या, मतदानाची कमी झालेली टक्केवारी आणि मतदारांच्या अनुत्साहामुळे कोणत्या मतदारसंघात कोण बाजी मारेल, याची उत्सुकता प्रत्येकाला लागली आहे. मतमोजणीला जाणाऱ्या प्रतिनिधींना पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडून सूचना देण्यात आल्या आहे. विदर्भातील विविध जिल्ह्य़ात कोण निवडून येणार, याची चर्चा सुरू असून लोकांची उत्सुकता शिगेला पोहोचली, हे मात्र तितकेच खरे.