महापालिका कर्मचारी व गरिबांना स्वस्त घरे मिळणार!

महापालिका हद्दीतील गरिबांना घरकुल योजनेंतर्गत आणि महापालिकेतील चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांसाठी स्वस्त घरे बांधण्यात येणार आहेत.

महापालिका हद्दीतील गरिबांना घरकुल योजनेंतर्गत आणि महापालिकेतील चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांसाठी स्वस्त घरे बांधण्यात येणार आहेत. म्हाडाच्या धर्तीवर ही योजना राबविण्यात येणार आहे. या  प्रस्तावाला स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. येणाऱ्या महासभेत हा प्रस्ताव ठेवण्यात येणार आहे. बंद पडलेल्या महापालिकेच्या शाळेच्या जागेवर घरकुल योजना राबविण्यात येणार आहे. या
 योजनेमुळे अनुसूचित जाती जमाती, मागासवर्गीय आणि महापालिकेतील चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांना घरे मिळणार आहे. या योजनेसाठी समिती स्थापन करण्यात आली असून ही समिती लवकरच धोरणात्मक प्रारुप तयार करून ते महासभेत ठेवणार आहे. या योजनेबाबत माहिती देताना स्थायी समिती अध्यक्ष अविनाश ठाकरे यांनी सांगितले, नागरिकांना स्वस्त घरकुल योजना राबविण्यासाठी विविध भौतिक सुविधा, गाळ्याचे आरक्षण, निश्चित कार्यपद्धती, भाडे तत्वावर देण्यासंबंधी अटी व देखभाल दुरस्ती संबंधी निर्णय  घेण्यासाठी समिती निश्चित करण्यात आली आहे. ही योजना आर्थिक दृष्टय़ा मागासलेल्या नागरिकांसाठी व महापालिकेतील चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांसाठी आहे. ज्यांचे स्वतचे घर नाही असे लोक यासाठी अर्ज करू शकतील. ज्यांचे उत्पन्न दरमहा ८ हजार ते २० हजार आणि मध्यम गटासाठी २० हजार ४० हजार आहे अशा लोकांसाठी ही योजना आहे. अर्ज मागवून सोडतीद्वारे निवडक लोकांची प्रतीक्षा यादी तयार करण्यात येईल. रामदासपेठमधील महापालिका शाळा, भानखेडा मराठी प्रायमरी शाळा, जुनी मंगळवारी महापालिका शाळा, बंगाली पंजा हिंदी मराठी प्रा. शाळा, कर्मवीर शिंदे मराठी उच्च मराठी प्रा. शाळा, तुकाराम लांजेवार शाळा मौजा वडपाकड या बंद असलेल्या शाळांचा समावेश आहे. शहरातील विविध भागातील रस्त्त्याच्या डांबरीकरणाच्या कामांना मंजुरी देण्यात आली आहे. नागपूर महोत्सवातंर्गत होणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमासाठी होणाऱ्या खर्चाला समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Nagpur municipal corporation to built homes for poor and corporation workers

ताज्या बातम्या