डॉक्टरला मारहाण केल्यानंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (मेडिकल) निवासी डॉक्टरांनी १७ जूनपासून पुकारलेला संप गुरुवारी मुंबईत झालेल्या बैठकीतील तोडग्यानंतर मागे घेतला आहे. मागण्या मान्य झाल्याने हा संप मागे घेण्यात येत असल्याचे ‘मार्ड’ने म्हटले आहे. हा संप मागे घेण्यात आल्याने गेल्या तीन दिवसांपासून आरोग्य सेवेपासून वंचित असलेल्या शेकडो रुग्णांचा जीव भांडय़ात पडला आहे.
१६ जूनला सायंकाळी ४.३० वाजता मेडिकलमधील वार्ड क्र. २७मध्ये डॉ. बाहेती यांना मारहाण करण्यात आली होती. आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक करावी, रुग्णालयातील सुरक्षा रक्षकांची संख्या वाढवावी व परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे लावावे या मागणीच्या पूर्ततेसाठी १७ जूनला सकाळी ८ वाजेपासून निवासी डॉक्टर संपावर गेले होते. या संपात मेडिकलमधील जवळपास ३०० निवासी डॉक्टर सहभागी झाले होते. या संपामुळे मेडिकलमधील आरोग्य सेवा कोलमडली होती. संप मागे घ्यावा यासाठी मेडिकलचे प्रशासन प्रयत्न करत होते. परंतु त्यात यश आले नाही.  त्यामुळे वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. प्रवीण शिनगारे यांनी मार्डच्या पदाधिकाऱ्यांना वाटाघाटीसाठी मुंबईला बोलावले होते. त्यानुसार गुरुवारी दुपारी ३ वाजता बैठक सुरू झाली. या बैठकीत वैद्यकीय शिक्षण मंत्री जितेंद्र आव्हाड, डॉ. प्रवीण शिनगारे व मेडिकलमधील मार्डचे अध्यक्ष डॉ. आयुध मगदूम, सचिव डॉ. नोव्हील ब्राम्हणकर हे सहभागी झाले होते. संपूर्ण राज्यातील शासकीय रुग्णालयात निवासी डॉक्टरांवर हल्ले होण्याचे प्रमाण वाढले असल्याकडे बैठकीत लक्ष वेधण्यात आले.