स्वतंत्र विदर्भ राज्य करण्यासाठी कटिबद्ध असून १५ फेब्रुवारी ते ५ मार्चदरम्यान  सिंदखेड राजा ते कालेश्वर (गडचिरोली) अशी विदर्भ गर्जना यात्रा निघणार असून त्या माध्यमातून गावागावात जनजागृती करण्यात येईल, अशी घोषणा विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या राष्ट्रीय अधिवेशनात करण्यात आली.
विदर्भ राज्य आंदोलन समितीतर्फे आयोजित करण्यात आलेल्या दोन दिवसीय राष्ट्रीय अधिवेशनाचा समारोप चिटणीस पार्कमध्ये झाला, त्यावेळी घोषणा करण्यात आली. यावेळी स्वतंत्र विदर्भासंदर्भात आठ ठराव मांडण्यात आले असून त्यालाही अधिवेशनात मंजुरी देण्यात आली. समारोपाला माजी आमदार वामनराव चटप, राम नेवले, डॉ. श्रीनिवास खांदेवाले, शैलजा देशपाडे, धनंजय धार्मिक, अ‍ॅड. नंदा पराते, अ‍ॅड अजयकुमार चमेडिया आदी विदर्भवादी नेते उपस्थित होते.
यावेळी बोलताना वामनराव चटप म्हणाले, स्वतंत्र विदर्भाच्या मागणीसाठी आतापर्यंत अनेक आंदोलने झाली. जनतेमध्ये जागृती करण्यासाठी सिंदखेडराजा ते कालेश्वर अशी विदर्भ गर्जना यात्रा काढण्यात येणार आहे. विविध राजकीय पक्ष स्वतंत्र विदर्भाच्या मुद्दय़ावर केवळ राजकारण करीत आहेत. मात्र, विदर्भ आंदोलन समिती यापुढे स्वतंत्र विदर्भ राज्य करण्यासाठी पुढाकार घेणार आहे. ही यात्रा शंभर तालुक्यांमध्ये जाणार आहे. ३० एप्रिल २०१५ पर्यंत स्वतंत्र विदर्भ राज्य करण्यात आले नाही तर आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशारा त्यांनी यावेळी दिला.
अर्थतज्ज्ञ डॉ. श्रीनिवास खांदेवाले यांनी विदर्भ विकासाचा आराखडा मांडला. विदर्भ वैधानिक महामंडळची मुदत ३० एप्रिल २०१५ संपत असताना त्यांना राज्य सरकारने पुढील पाच वर्षांसाठी मुदतवाढ देण्यासंदर्भातील प्रस्ताव केंद्र सरकारला पाठविला आहे. मात्र, हा प्रस्ताव रद्द करण्यात यावा अशी मागणी यावेळी त्यांनी केली. यावेळी राम नेवले यांनी दोन दिवसीय अधिवेशनात झालेल्या विविध विषयांची माहिती दिली.