जन्मत:च मतिमंदत्व नशिबी आलेल्या मुलांना लहानाचे मोठे करताना करावी लागणारी कसरत सर्वश्रूत असली, तरी त्यांना जीवनभर पाठबळ देऊन सामाजात स्थान मिळवून देण्यात पालकांना कमालीची कसरत करावी लागते. मात्र, या मुलांचा सांभाळ व त्यांना असलेली गरज भागवताना पालकांची दमछाक होते. अशात पालकच मुलांचा तिरस्कार करत असल्याचे समोर येत आहे. राज्यातील २ लाख १३ हजार २७४ मतिमंद हे शासनाकडून आíथक व सामाजिक सहकार्य मिळेल, या आशेवर ते जगत आहेत, परंतु अद्याप त्यांच्याकडे आघाडी शासनाने लक्ष न दिल्याने युती सरकार तरी आस्थेने लक्ष देईल, या अपेक्षेत ते आहेत.
गोंदिया जिल्ह्यात सर्वशिक्षा अभियानांतर्गत सुमारे दीड हजार मतिमंदाची नोंद आहे, तर राज्यपातळीवर ही आकडेवारी बघितली असता पुरुषांची संख्या १ लाख २३ हजार १३९ व महिला मतिमंदांची संख्या ९० हजार १३५, अशी एकूण २ लाख १३ हजार २७४ मतिमंदांची नोंद शासनदरबारी आहे. शासन या मुलांना समाजात स्थान देण्यासाठी कसोशीने प्रयत्न करत असले तरी पालकांना आयुष्यभर अशा मुलांचा सांभाळ करणे गरसोयीचे ठरत आहे. पालकांसाठी आव्हान असले तरी अशा मुलांना समाजाबरोबरच कुटुंबीयांकडूनही अनेकदा तिरस्काराचा सामना करावा लागतो. अशा मुलांना समाजापेक्षाही पालकांच्या आधाराची मोठी गरज असते. शासनातर्फे दरवर्षी ८ ते १६ डिसेंबरदरम्यान मतिमंदत्व पुनर्वसन सप्ताह राबविण्यात येतो. मतिमंद व गतिमंद मुलांना पालकांच्या आधाराची गरज आहे. तीव्र व अतितीव्र मतिमंद मुलांच्या पालकांना त्यांना सतत सांभाळावे लागते. कुठेही उचलूनच न्यावे लागते. त्यात पालकांची दमछाक होते. तसेच ‘सेलेब्रल पाल्सी’ मुले चालू-बसू शकत नाहीत. त्यामुळे त्यांनाही इकडून तिकडे उचलून न्यावे लागते.
मुलांचे मतिमंदत्व कुठल्याही प्रकारचे असले, तरी पालकांची मानसिकता बिघडतेच. अशा मुलांना जन्मभर सांभाळण्याच्या कल्पनेने अनेक पालक निराश होत असल्याने या मुलांच्या संगोपनाचा पालकावर परिणाम जाणवतो.
आपले मूलही सामान्य मुलांसारखे व्हावे, यासाठी काही पालक प्रचंड धडपड, तर काही मुलांचा सांभाळ करण्याताना हेळसांडही करतात. अशा मुलांच्या आईची कुचंबणा होते. मुलाला मतिमंदत्व असणे हे पालकांना कमीपणाचे वाटते, त्यामुळे त्यांचे मतिमंदत्व झाकून ठेवण्याकडे त्यांचा कल असतो. त्यामुळे अशा मुलांना सण, समारंभात नेले जात नाही. या मुलांना अनेक सवलती असतात, पालकांना प्राप्तिकरात सवलत मिळते, इतरही अनेक ठिकाणी सवलती असतात, परंतु शासकीय रुग्णालयातून तसे प्रमाणपत्र मिळवावे लागते. सौम्य मतिमंद या प्रकारात या मुलांना शिक्षणयोग्य म्हटले जाते. त्यांच्या मेंदूत फारशी विकृती नसते. त्यांना मतिमंदांसाठीच्या खास शाळांमधे प्रशिक्षण दिले तर त्यांची सामाजिक कौशल्ये काही प्रमाणात वाढू शकतात. मध्यम मतिमंदांची बौद्धिक क्षमता मोठेपणी ४ ते ७ वर्षे वयाच्या मुलांइतकी होते. त्यांना थोडेफार लेखन-वाचन शिकवता येऊ शकते. काही मुलात संगीत, चित्रकला, वाद्यवाचन कौशल्ये आढळून येतात. लहानपणीच हे ओळखून शिक्षण देऊन त्यांना स्वयंपूर्ण बनवता येते. तीव्र मतिमंद मुलांमध्ये स्नायू आणि वाचा यांचा विकास झालेला नसतो. स्पीच थेरेपीने त्यांना थोडेफार बोलण्याचे प्रशिक्षण दिले जाते. त्यांचे कान, डोळे यात दोष आढळून येतो. वैयक्तिक स्वच्छता आणि स्वत:ची देखभालीसाठी त्यांना प्रशिक्षण द्यावे लागते, परंतु त्यासाठी त्यांची आयुष्यभर देखरेख करावी लागते. अतितीव्र मतिमंद मुलांना आयुष्यभर आधाराची गरज असते. त्यांच्यात शारीरिक व्यंग, मज्जासंस्थेतील विकृती असतात. वारंवार फिट्स येणे, बहिरेपणा, मुकेपणा असतो. रोगप्रतिकारकशक्ती अतिशय कमी असते. गतिमंद मुलांना काही विषय मर्यादितपणे शिकवणे शक्य असते.