राज्यातील चार शासकीय अनुदानित खासगी आयुर्वेदिक व युनानी महाविद्यालयांतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्ती वेतन व ग्रॅच्युइटी योजना लागू करण्यास राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली.
ही योजना अमरावतीच्या विदर्भ माहविद्यालय, नागपूरच्या श्री आयुर्वेद महाविद्यालय, मोझरी येथील श्री गुरुदेव आयुर्वेद महाविद्यालय आणि यवतमाळ येथील डॉ. मा. म. आयुर्वेद महाविद्यालय या चार महाविद्यालयांना लागू होणार आहे.
आयुर्वेद विकास मंचाने आयुर्वेद क्षेत्रातील विद्यार्थी, प्राध्यापक, वैद्यकीय व्यावसायिक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी महाविद्यालयांमधील समस्या सोडवण्यासाठी वैद्यकीय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांची भेट घेऊन त्यांच्यासमोर म्हणणे मांडले होते. विनोद तावडे यांनी या विषयाचा पाठपुरावा करून या विषयाचा मंत्रिमंडळ प्रस्ताव तयार केला होता.
मंडळाच्या बैठकीत या प्रस्तावास मंजुरी देण्यात आली आहे. या निर्णयामुळे चार आयुर्वेद महाविद्यालयातील शासनमान्य कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्ती, ग्रॅच्युइटी तसेच पारिभाषित निवृत्ती योजनेचा लाभ मिळू शकणार आहे.