तालुक्यातील पारधी बेडा कापरा येथील पारधी जमात अतिशय दयनीय अवस्थेत आहेत. त्यांच्या मदतीसाठी येथील डॉ.बाबासाहेब नंदुरकर  महाविद्यालयाच्या संगणक व शारीरिक शिक्षण विभागाच्या प्राध्यापकांनी पुढाकार घेतला आहे.    
येथून २० कि.मी.वरील या पारधी बेडय़ातील लोकांच्या अनेक समस्या आहेत. स्वातंत्र्याच्या ६७ वर्षांनंतरही माणूस म्हणून जगण्याइतपत कुठल्याही सोयी-सुविधांपासून ते वंचित आहेत. हा समाजाचा घटक आहे. त्यांनाही सन्मानाने व चांगले जीवन जगता यावे, याकरिता महाविद्यालयाचे संगणक व शारीरिक विभागाचे प्राध्यापक सरसावले असून त्यांनी कापरा पारधी बेडय़ाला वारंवार भेटी देऊन त्यांचे सविस्तर सर्वेक्षण सुरू केले. प्राथमिक सर्वेक्षणात त्याच वस्तीत ९० ते ९५ टक्के मुलामुलींचे विवाह होत असून मुलींचे लग्न मासिक पाळी आली त्याच वर्षी व मुलांचे लग्न १५-१६ व्या वर्षीच होत आहेत. तसेच वयाच्या २० वर्षांपर्यंत मुली ३-४ मुलांच्या आई झालेल्या आहेत.
त्यामुळे त्या माता व त्यांची बालके हे विविध रोगाने ग्रस्त आहेत. दैनंदिन जगण्यासाठी आवश्यक सोयी सुविधा कापरा येथील पारधी बेडय़ावर नाहीत. एकही घर नाही, उपजिविकेसाठी साधन नाही.
पारधी बांधवांना समाजाने शासनाने मदत केली तरच ते समाजाच्या मुख्य प्रवाहात सामील होऊ शकतील, याकरीता सर्वानी सहकार्य करावे, असे आवाहन श्री सत्यसाई सेवा संघटनेचे जाधव, राऊत, लीना नंदुरकर आदींना केले आहे.