केंद्रातील नरेंद्र मोदीच्या नेतृत्वाखालील भाजप सरकार सत्तेत आल्यानंतर त्यांच्याभोवती सर्व उद्योगपती एकवटले आहेत. हे लक्षात घेत असतानाच सध्याच्या या परिस्थितीने डाव्या व परिवर्तनवादी शक्तीसमोर आव्हान उभे ठाकले आहे. अशा प्रतिकूल परिस्थितीतच संधीही प्राप्त होत असतात, असे प्रतिपादन मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाचे प्रदेश सदस्य कुमार शिराळकर यांनी केले.
पक्षाचे नागपूर जिल्हा सचिव बी.पी. कश्यप यांच्या स्मृतिनिमित्त कॉटन मार्केटमधील ए.के. गोपालन भवन येथे आयोजित ‘मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाची ५० वर्षे’ या विषयावरील व्याख्यानात प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी भूपाल चॅटर्जी होते. पक्षाचे जिल्हा सचिव मनोहर मुळे प्रामुख्याने उपस्थित होते. कुमार शिराळकर म्हणाले, मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाने स्थापनेपासूनच अशी अनेक आव्हाने पेलली आहे. १९६४ मध्ये पक्ष स्थापनेच्या वेळीच चीनचे एजन्ट्स म्हणून पक्षाच्या कार्यकर्त्यांना अटक करण्यात येत होती. यानंतर २० वर्षेपर्यंत सोव्हिएत युनियन व चीनच्या कम्युनिस्ट पक्षांनी मान्यता दिली नव्हती. पक्षाने नेहमीच आंतरराष्ट्रीय परिस्थिती व भारतीय परिस्थितीचे ठोस विश्लेषण करून आपले डावपेच आखले आहेत. आज साम्राज्यवाद्यांमधील अंतर्विरोध तेवढय़ा टोकाचे राहिलेले नाहीत. उलट आज बऱ्याच बाबतीत एकमत होऊन त्यांनी तिसऱ्या जगातील देशामधील उत्पादन साधनांवर ताबा मिळवण्यात व त्यांचे शोषण करण्यात साम्राज्यवादी देश आगेकूच करीत असल्याचेही त्यांनी सांगितले.
भारतातील कम्युनिस्ट पक्षात फूट पडली ती वैचारिक आधारावर. स्वातंत्र्यापूर्वी कम्युनिस्ट पक्षाची स्थापना झाली, तेव्हा सरकारचे वर्गीय विश्लेषण करण्याचा प्रश्नच नव्हता. कारण प्रत्यक्ष साम्राज्यवाद्यांचेच सरकार देशात होते. पण नंतर भारतीय केंद्र सरकारचे वर्गीय विश्लेषण करण्यामधूनच मतभेद समोर आल्याचेही शिराळकर म्हणाले. मनोहर मुळे यांनी प्रास्ताविकातून कार्यक्रमाची रुपरेखा मांडली.