वाहतूक सिग्नल तोडणाऱ्यावर १०० रुपये दंडाची तरतूद असलेले कलम लावण्याऐवजी ६०० रुपये दंडाचे कलम लावण्यात येत असल्याची बाब उघडकीस आली आहे. यातही गंमत अशी की, अशा वाहनचालकाने चिरीमिरी न दिल्यास दंडापोटी सर्रास ६०० रुपये आकारले जात असल्याचेही प्रकार घडत आहेत.  
वाहतूक नियमांचे पालन व्हावे आणि वाहतूक सुरळीत, तसेच सुरक्षित व्हावी, हा हेतू वाहतूक नियमांचा असला तरी नागरिकांकडून त्यांचे उल्लंघन आणि पोलिसांकडून या कायद्याचा सर्रास गैरवापर होत असताना दिसून येते. पोलिसांनी संबंधित कलमाद्वारे दंड आकारून पुन्हा तसा गुन्हा घडणार नाही, याची काळजी घेणे अपेक्षित आहे, परंतु केवळ नियमांचा आणि कायद्यातील शब्दांचा नागरिकांचा छळण्यासाठी वापर केला जात आहे.
मुख्यमंत्र्यांकडे पोलीस दलाची जबाबदारी असल्याने नागपूर वाहतूक पोलीस अधिक कर्तव्य दक्ष झाले काय, अशी शंका निर्माण होण्यासारखे वातावरण आहे. गेल्या काही दिवसांपासून शहरात वाहतूक सिग्नल तोडणाऱ्यांविरुद्ध इतरांच्या जीवास धोका होईल, अशाप्रकारे वाहन चालविण्याचा गुन्हा दाखल करण्यात येऊ लागला आहे. यासाठी माजी केंद्रीय मंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या अपघाताचाही दाखला पोलीस देऊ लागले आहेत. शहरातील सर्वात वर्दळ असलेला व्हरायटी चौक, झाशी राणी चौक, पत्रकार सहनिवास आणि इतर चौकात अशा प्रकारची पोलिसांनी कारवाई केली आहे. या सर्व चौकात लाल सिग्नल असताना चौक ओलांडणाऱ्या वाहनाकडून इतर वाहनचालकांच्या जीवास धोका होईल, अशा पद्धतीने वाहन चालविण्याचे कलम ११९/ १८४/ १८४ एमयूए कलमांनुसार कारवाई करण्यात आली आहे. सिग्नल तोडणे हा गुन्हा असून त्यासाठी १०० रुपये दंड आकारण्यात येतो. मात्र, सिग्नल तोडण्याचे कलम लावण्याऐवजी निष्काळजीपणे इतरांच्या जीवास धोकादायक होईल, अशा रितीने वाहन चालविण्याचे कलम लावण्यात येत आहे. अशाप्रकारची कारवाई एका प्राध्यापकांवर झाली. त्यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले की, पत्नीसोबत व्हरायटी चौकातून जात असताना ग्रीन सिग्नल संपल्यानंतर लाल सिग्नल आले. पोलिसांनी वाहन अडविले आणि वाहन चालान करण्यात येत असल्याचे सांगितले. आम्ही त्यास सहकार्य केले, परंतु संबंधित पोलीस शिपायांनी सिग्नल तोडण्यासाठी लागणारे कलम न लावता निष्काळजीपणे वेगात वाहन चालविण्याचे कलम लावले. आम्हा पती-पत्नीला जीवाची काळजी नाही. त्यामुळे वर्दळ असलेल्या चौकातून वेगात वाहन चालवितो, असा त्याचा अर्थ होतो. अशाप्रकारे पोलिसांकडून नियमांचे उल्लंघन होत आहे, असे प्रा. मजिद पठाण म्हणाले.
कारवाई योग्यच
वाहतूक सिग्नल तोडल्यास निष्काळजीपणे वाहन चालविणे गुन्हा ठरतो. ग्रीन सिग्नल असलेल्या बाजूच्या वाहनांना या वाहनाची धडक लागण्याची शक्यता असते. यासंदर्भात न्यायालयाचे आदेशही आहेत. त्यामुळे सिग्नल तोडणाऱ्यांवर पोलीस करीत असलेली कारवाई योग्य ठरते.
भारत तांगडे, पोलीस उपायुक्त वाहतूक, नागपूर