चिन्मय देशकरची ‘सिरीयस ड्रामे’बाजी

सगळे फासे व्यवस्थित पडले असते तर सुपरस्टार अमिताभ बच्चनबरोबर तो आपल्याला ‘भूतनाथ रिटर्न्‍स’मध्ये मोठय़ा पडद्यावर काम करताना दिसला

सगळे फासे व्यवस्थित पडले असते तर सुपरस्टार अमिताभ बच्चनबरोबर तो आपल्याला ‘भूतनाथ रिटर्न्‍स’मध्ये मोठय़ा पडद्यावर काम करताना दिसला असता. कुणालाही हेवा वाटावा, अशी संधी त्याला अभिनयाच्या पहिल्या पायरीवर मिळाली होती. पण घडायचे वेगळेच होते. नागपूरहून मुंबईला येणारा कलावंत घेण्यापेक्षा मुंबईतीलच कलावंताला पसंती देण्यात आली. अभिनयात अव्वल असूनही केवळ नागपूरला वास्तव्यास असल्याने त्याच्यापासून मोठी संधी हिरावली गेली. त्याच दिवशी मुंबईकडे कूच करण्याचे निश्चित झाले आणि आता पुन्हा एकदा संधी त्याच्यावर प्रसन्न होऊ लागल्या आहेत. ही गोष्ट आहे आपल्याच नागपूरच्या गुणी बाल कलावंत चिन्मय देशकरची..
चिन्मय व त्याचे वडील प्रवीण देशकर यांनी ‘लोकसत्ता’ला दिलेल्या भेटीदरम्यान या हुकलेल्या संधीची माहिती दिली. ‘इंडियाज बेस्ट ड्रामेबाज’ या रिअ‍ॅलिटी शोमधून आपल्या अभिनय कौशल्याची छाप पाडणारा नागपूरचा बाल कलावंत चिन्मय देशकर आता ‘रिअ‍ॅलिटी शो’चे मर्यादित जग ओलांडून अभिनयाच्या विस्तीर्ण क्षेत्रात मार्गक्रमण करण्यास सज्ज झाला आहे. कलर्स टीव्हीवरील चक्रवर्ती अशोका सम्राट मालिकेतून झळकणारा चिन्मय आता मोठय़ा पडद्यावरही आपली चुणूक दाखवताना दिसणार आहे. चिन्मयचे लागोपाठ दोन चित्रपट येत्या काळात प्रदर्शित होणार आहेत व सयाजी शिंदे सारख्या मोठय़ा कलावंतांसह काम करण्याची संधी मिळणार आहे.
कलर्स टीव्हीवरील मालिकेत बाल अशोकाच्या मित्राची भूमिका चिन्मय साकारत आहे. याशिवाय, ‘फ्रेंड’ या हिंदी चित्रपटात व त्याचेच तेलगु रूपांतर असलेल्या ‘फादर’ चित्रपटात चिन्मय भूमिका साकारत आहे. या व्यतिरिक्त ‘दोन दिवस’ व ‘छोटू’ हे चित्रपट तसेच ‘दोन घास सुखाचे’ ही दूरचित्रवाणी मालिका यामधूनही तो भूमिका साकारत आहे. ‘ड्रामेबाज’ नंतर प्रत्येक कामात अनेक नव्या गोष्टी शिकायला मिळाल्याचे चिन्मय म्हणतो. ‘सयाजी शिंदे, समीर धर्माधिकारी किंवा कमलराज यासारख्या कलावंतांच्यासमोर काम करताना सुरुवातीला तणाव जाणवत होता. प्रत्यक्ष चित्रीकरणातही प्रारंभी याचा परिणाम झाला. मात्र, सयाजी शिंदे असतील किंवा समीर धर्माधिकारी यांनी मला सांभाळूनही घेतले आणि ताणही हलका केला. नंतर सुमारे वर्षभर मी त्यांच्याबरोबर काम केले आणि मग मात्र ते इतके मोठे स्टार आहेत, याचे दडपण येणे कमी झाले,’ असे चिन्मय म्हणाला.
बूगी वूगी, दम दमा दम, सुपर डान्सर यासारख्या ‘रिअ‍ॅलिटी शो’मध्ये यश प्राप्त करणाऱ्या चिन्मयने अभ्यासाबरोबर आता इतर अनेक गोष्टी शिकण्यास प्रारंभ केला आहे. स्केटिंग, पोहणे, घोडेस्वारी, तायक्वांडो इत्यादींचे प्रशिक्षण घेणे सुरू केले आहे. घरातूनच अभिनयाचा वारसा असलेल्या चिन्मयला अभिनयाच्या बाबतीत आई-वडिलाचे मार्गदर्शन मिळत असते. अभिनय क्षेत्रात करियर करावयाचे हे निश्चित केले आहे व त्यादृष्टीने तयारीही सुरू केली आहे, असेही चिन्मयने सांगितले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व नागपूर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Nagpur vidarbh news

ताज्या बातम्या