पश्चिम विदर्भ आणि मराठवाडय़ातील शेतकरी व नागरिकांसाठी जीवनदायी, असा उल्लेख करण्यात येत असलेल्या वर्धा-नांदेड-व्हाया यवतमाळ या नवीन रेल्वे मार्गाला गेल्या रेल्वे अर्थसंकल्पात ज्या पद्धतीने तत्कालीन रेल्वेमंत्री सदानंद गौडा यांनी वाटाण्याच्या अक्षता लावल्या तोच कित्ता आता नवे रेल्वेमंत्री सुरेश प्रभू लावणार की काय, या चच्रेला उधाण आले आहे.
सेना खासदार भावना गवळी सदानंद गौडा यांना साकडे घालून ‘वर्धा-नांदेड-व्हाया यवतमाळ ’साठी ५०० कोटींची तरतूद करण्याची मागणी केली होती, पण ती अदखलपात्र ठरली. आता पुसद, उमरखेड, आर्वीच्या विविध संघटनांनी मोच्रे काढून ‘वर्धा-नांदेड-व्हाया यवतमाळ’ सह यवतमाळ-मूर्तीजापूर, पुलगाव-आर्वी, या ‘शंकुतलां’चा उध्दार करण्याची मागणी केली आहे. ‘वर्धा-नांदेड-व्हाया यवतमाळ’ हा प्रकल्प तीन वर्षांत पूर्ण केला जाईल, अशी घोषणा तत्कालीन रेल्वेमंत्री लालूप्रसाद यांनी यवतमाळात केली होती.
गंमत अशी की, आता ६ वर्षांनंतरही रेल्वेमार्गाचे काम फक्त ३.७ टक्के झाले आहे. २७० कि.मी. लांबीच्या प्रकल्पाचा खर्च तेव्हा २७४ कोटी ५५ लाख रुपये अपेक्षित होता. या प्रकल्पावर खर्च होणाऱ्या रकमेच्या ४० टक्के रक्कम राज्य सरकार आणि ६० टक्के रक्कम केंद्र सरकार खर्च करणार आहे.
जमीन अधिग्रहणाचे काम सुरू आहे, तर सर्वेक्षणाचे कामही पूर्ण झाल्याचा दावा करण्यात येत आहे.
विशेष असे की, हा प्रकल्प पूर्ण करण्याच्या दृष्टीने विशेष असे कोणतेही प्रयत्न रेल्वे मंत्रालयाने केले नसल्याची कबुली सुद्धा शासनाने दिली आहे. उपलब्ध असलेला निधी लक्षात घेऊनच प्रकल्पाचे काम कासवगतीने सुरू असल्याचेही सरकारने मान्य केले आहे. ही सर्व वस्तुस्थिती लक्षात घेऊन हा प्रकल्प लवकरात लवकर मार्गी लावावा, यासाठी सेना खासदार भावना गवळींचे प्रयत्न निष्फळ ठरल्यानंतर आता जनताच रस्त्यावर आली आहे. जे सदानंद गौडा यांनी गेल्या अर्थसंकल्पात केले तोच कित्ता सुरेश प्रभु गिरवतील की काय, अशी भीती आंदोलकांना वाटत आहे.