मोठय़ा इमारतींचे बांधकाम करत असताना अग्निशमन यंत्र बसवण्यात यावे, असा नियम असताना या नियमाचा फज्जा उडवण्यात येत असल्याचे दिसून येत आहे. शहरातील २ हजार ८८० इमारतींमध्ये अग्निशमन यंत्रच नसल्याचे उघडकीस आले असून याप्रकरणी ४८४ इमारत मालकांना अग्निशमन विभागाने नोटीस बजावली आहे.
१ एप्रिल २०१४ ते ३१ डिसेंबर २०१४ या नऊ महिन्याच्या कालावधीत शहरात एकूण ५४९ आगीच्या घटना घडल्या. त्यामध्ये मोठय़ा स्वरूपाच्या ६२, मध्यम स्वरूपाच्या १४१ आणि लहान स्वरूपाच्या ४४६ घटनांचा समावेश होता. यामध्ये १२ कोटी ६० लाख ०८ हजार ६०० रुपयांची मालमत्ता नष्ट झाली. तर ५५ कोटी ७४ लाख २४ हजार ४०० रुपये किंमतीची मालमत्ता वाचवण्यात अग्निशमन विभागाला यश मिळाले आहे. या कालावधीमध्ये १६ महिला आणि ५१ पुरुषांचा मृत्यू झाला. तर ४ महिला आणि ११ पुरुष जखमी झालेत. १ एप्रिल २०१३ ते ३१ मार्च २०१४ या कालावधीत एकूण ७१४ आगीच्या घटना घडल्या होत्या. त्यामध्ये मोठय़ा ११६, मध्यम १८८ आणि ७१४ किरकोळ घटनांचा समावेश होता. या घटनांमध्ये २० कोटी ४० लाख ६० हजार ८९५ रुपयांच्या मालमत्तेची हानी झाली. तर एक अब्ज रुपयांपेक्षा अधिक किंमतीची मालमत्ता वाचवण्यास यश प्राप्त झाले. या कालावधीत २० महिला आणि ७१ पुरुषांचा जळून मृत्यू झाला. तर १३ महिला आणि १८ पुरुष जखमी झालेत. माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांना ही माहिती प्राप्त झाली आहे.
गेल्या पाच वर्षांच्या कालावधीत अग्निशमन उपकरणे नसणाऱ्या ४८४ इमारतींच्या मालकांना नोटीस बजावण्यात आल्या आहेत. दंडाबाबत कोणताही कायदा अस्तित्वात नसल्याने नियमांचे उल्लंघन करणाऱ्या इमारत मालकांवर दंड ठोठावण्यात आला नसल्याचे उत्तरही प्राप्त झाले.
अग्निशमन विभागाकडे फक्त १५ मीटर उंची असलेल्या इमारतीतील आग विझवण्यासाठीच वाहन आहे. यापेक्षा उंच इमारतीला आग लागली तर तसे वाहन नसल्याची कबुलीही विभागाने दिली आहे. अग्निशमन विभागाकडे फायर टेंडर (वेगवेगळ्या क्षमतेचे) १६ असून ते सध्या सुस्थितीत आहेत. छोटे अग्निशमन बंब (स्माल फायर टेंडर) एकूण तीन असून त्यापैकी एक बंद स्थितीत आहे. १० हजार लिटर क्षमतेचे पाण्याचे टँकर २, फोम टेंडर १, हायड्रोलिक प्लॅटफार्म १, रॅपीड इंटरव्हेशन वाहन १, यंत्रसामुग्री वाहून नेणारी जीप १, टाटा सुमो, क्वालिस आणि मांझा कंपनीच्या एकूण जीप ३, फायर फायटिंग बाईक ४, मोटारसायकल (यामाहा) ७, पिकअप व्हॅन २ असून ही वाहने सुस्थितीत आहेत.
अग्निशमन विभागात एकूण ४११ जागा असून त्यापैकी फक्त २६१ जागा भरल्या आहेत. त्यामुळे १५० जागा रिक्त आहेत. यामध्ये सर्वाधिक आग विझवणाऱ्या अग्निक या पदाच्या ५४ जागा रिक्त आहेत. यानंतर सहायक स्थानाधिकारीचे १५ पदे मंजूर असून त्यापैकी फक्त एकच पद भरण्यात आले आहेत. तर १४ पदे रिक्त आहेत. वरिष्ठ अग्रेसर अग्निकचे १५ पदे मंजूर असून त्यापैकी एकही पद भरण्यात आले नाहीत. वाहन चालकाचे २७, टेलिफोन ऑपरेटरचे ६, हॅड्रन्ट मिस्त्रीचे ८ व स्ट्रेचर बॉयचे ५ पदे रिक्त असल्याची माहितीही प्राप्त झाली आहे.