तीन प्रमुख वाळू तस्करांनी पोंभूर्णा तालुक्यातील अंधारी नदीच्या मोहाळा, चेक आष्टा व वेळवा या तीन प्रमुख वाळू घाटांवर डाका घातला असून, मध्यरात्री नदी पात्रात पोकलॅन व जेसीबी उतरवून उपसा सुरू केला आहे. या तस्करांनी आतापर्यंत किमान ५० कोटीच्या वाळूची तस्करी केल्याचा प्राथमिक अंदाज आहे. दरम्यान, जिल्हा प्रशासन, खनिकर्म अधिकारी व तहसीलदाराचा तस्करांना आशीर्वाद असल्याने शासनाचा कोटय़वधीचा महसूल बुडाला आहे.
ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाची जीवनवाहिनी, अशी ओळख असलेली अंधारी नदी ही पोंभूर्णा तालुक्यातून वाहते. नदीचे पात्र मोठे असल्याने बांधकामासाठी लागणारी वाळू नदीच्या अथांग पात्रात पसरलेली आहे. या नदीवर आठ ते दहा वाळू घाट असले तरी मोहाळा, चेक आष्टा व वेळवा, या तीन प्रमुख घाटांवरून वाळूचा सर्वाधिक उपसा केला जातो. यातील मोहाळा हा घाट अश्वीन ठाकूर, वेळवा हा मनोजकुमार, तर चेक आष्टा चंदेल यांनी लिलावात घेतलेला होता. दरम्यान, पर्यावरण खात्याच्या मंजुरीअभावी लिलाव प्रक्रिया रखडलेली आहे. अशातही नदी काठावर मोठय़ा प्रमाणात वाळूचा साठा करून ठेवण्यात आलेला आहे. त्याचीही मुदत २४ नोव्हेंबर २०१४ रोजी संपल्यानंतरही मोहाळा, वेळवा व चेकआष्टा या पात्रातून वाळूचा उपसा सुरूच आहे. ही बाब जिल्हाधिकारी डॉ.दीपक म्हैसेकर, तहसीलदार सोरते व खनिकर्म अधिकारी डॉ.आवळे यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतरही त्यांचे त्याकडे दुर्लक्ष आहे.
प्रस्तुत प्रतिनिधीने या तिन्ही घाटांना भेट दिली असता सोमवारी मध्यरात्री एक ते दीड वाजताच्या सुमारास महावीर एन्टरप्रायजेस व चिंटू पुगलिया यांच्या मालकीची जेसीबी व पोकलॅन नदीच्या पात्रात उतरून वाळू उपसा करीत होती. ही वाळू तुम्ही कोणासाठी काढताहात, अशी विचारणा केली असता ठाकूर या व्यक्तीचे नाव सांगण्यात आले. केवळ मोहाळाच नाही, तर वेळवा व चेक आष्टा घाटांवरही अशाच पध्दतीने वाळू उपसा सुरू होता. विशेष म्हणजे, या तस्करांनी नदी काठावरील शेतजमिनी भाडेपट्टीने घेतली आहे. रात्री जेसीबी लावून हायवा ट्रकमध्ये वाळू भरून या शेतजमिनीवर जमा करून ठेवली जाते. यानंतर दिवसभर ती ट्रक व हायवातून चंद्रपूर व अन्य ठिकाणी पाठविली जाते. नदी काठावरील परिसरात किमान आठ ते दहा ठिकाणी शेकडो ट्रक वाळू जमा करून ठेवण्यात आलेली आहे. विशेष म्हणजे, या तस्कारांनी चंद्रपूर शहरातील काही नामवंत बांधकाम व्यावसायिक व कंत्राटदारांकडून वाळू पुरवठय़ाची ऑर्डर घेतली आहे. त्यानुसारच पुरवठा सुरू आहे. एका दिवसाला किमान ३० ते ४० ट्रिप हायवातून ही वाळू चंद्रपूर शहरात पाठविली जाते. यामुळे अंधारी नदीचे पात्र खोल गेले आहे. या नदीतून आतापर्यंत किमान ५० कोटीवर वाळू उपसा या तस्करांनी केल्याचा अंदाज आहे.
विशेष म्हणजे, वाळू घाटांची मुदत दोन महिन्यापूर्वीच संपलेली असतांनाही अवैध उपसा सुरूच आहे. पोंभूर्णा-चंद्रपूर या ३० मिनिटाच्या अंतरावर मिनिटाला एक अवैध ट्रक दिसतो. वाळू तस्करांनी अंधारी नदीच्या पात्रावरच डाका टाकला असल्यामुळे शासनाचा कोटय़वधीचा महसूल बुडालेला आहे. यासंदर्भात अधिक माहितीसाठी पोंभूर्णाचे तहसीलदार सोरते यांच्याशी संपर्क साधला असता वाळू घाटाची मुदत दोन महिन्यापूर्वी संपली असली तरी साठवून ठेवलेली वाळू उचलण्याची शेवटची तारीख ३१ डिसेंबर आहे, असे ते म्हणाले. उपसा सुरू असल्याचे निदर्शनास आणून दिले असता ही जबाबदारी खनिकर्म विभागाची आहे. मी काय करू, तुम्ही जिल्हाधिकाऱ्यांना सांगा, असे ते लोकसत्ताशी बोलतांना म्हणाले. वाळू घाटाचा लिलाव करू नका, असे जिल्हाधिकाऱ्यांना कळविले आहे, असेही ते म्हणाले. आतापर्यंत दहा जणांना दंड ठोठावला असल्याची माहिती त्यांनी दिली. याबाबत खनिकर्म अधिकारी डॉ.आवळे यांना विचारले असता, तुम्ही तहसीलदारांना सांगा, असे म्हणून त्यांनीही जबाबदारी झटकली, तर जिल्हाधिकाऱ्यांच्या भ्रमणध्वनीवर संपर्क साधला असता संपर्क ते क्षेत्राच्या बाहेर होते. जिल्हा प्रशासन, पोलीस, खनिकर्म विभाग, तहसील कार्यालय, तसेच गावातील सरपंच व भाजपच्या काही नेत्यांना हाताशी धरून ही वाळू तस्करी सुरू आहे.
विशेष म्हणजे, प्रशासनातील सर्व अधिकारी जबाबदारी झटकून एकमेकांकडे अंगुलीनिर्देश करीत आहेत. नेमका याचाच फायदा तस्कर घेत आहेत. या तस्करीवर वेळीच र्निबध घातले नाही तर नदीचे पात्र वळते होण्याची शक्यता पर्यावरण अभ्यासक व्यक्त करीत आहेत.
नेत्यांचा वरदहस्त..
वाळू तस्करीमुळे पोंभूर्णा तालुक्यातील कोटय़वधी रुपयांच्या डांबरी रस्त्यांची दूरवस्था झालेली आहे. मोहाळी घाटाकडे जाणारा रस्ता तर अवघ्या काही महिन्यापूर्वी कोटय़वधीचा खर्च करून बांधण्यात आलेला होता. मात्र, तो अशा पध्दतीने खाली वर झाला आहे की तेथे रस्ता होता की नाही, अशी शंका येते. एकूणच या तस्करीमुळे पोंभूर्णा तालुक्यातील पूर्ण रस्ते खराब झाले आहेत. विशेष म्हणजे, या तस्करांना भाजपच्या स्थानिक नेत्यांचे अभय मिळत असल्याची चर्चा आहे.