विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात विद्यार्थ्यांना नवनवीन संधी उपलब्ध करून देणाऱ्या रामन विज्ञान केंद्राच्यावतीने १९ ते २१ फेब्रुवारीपर्यंत ‘विज्ञान आणि अभियांत्रिकी प्रदर्शन २०१५’ आयोजित करण्यात आले आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या तंत्रज्ञान विभागाच्या सहकार्याने आयोजित या प्रदर्शनात नागपूर आणि आसपासच्या परिसरातील विज्ञान आणि अभियांत्रिकी महाविद्यालये सहभागी होऊ शकतात. यादरम्यान विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
विद्यार्थ्यांमधील संशोधन वृत्तीला चालना देण्यासाठी आणि त्यांच्यातील कौशल्य विकसित करण्यासाठी विज्ञान व अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी स्वत: तयार केलेले तंत्रज्ञानाचे प्रकल्प तसेच प्रतिकृती यात सहभागी करून घेतल्या जाणार आहेत. तीन दिवस आयोजित या प्रदर्शनात हे प्रकल्प आणि प्रतिकृती ठेवण्यात येतील. प्रदर्शनाला भेट देणाऱ्या शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थी तसेच नागरिकांनाही या प्रकल्प आणि प्रतिकृतीविषयी संबंधित विद्यार्थ्यांना माहिती द्यायची आहे. सवरेत्कृष्ट प्रकल्प, प्रतिकृती आणि भित्तीपत्रकाकरिता आकर्षक पारितोषिके देण्यात येणार आहेत. प्रकल्प, प्रतिकृती व भित्तीपत्रकाचा मुख्य विषय ‘नैसर्गिक संसाधन व्यवस्थापनावर आधारित विज्ञान आणि तंत्रज्ञान’ असा आहे. तर ‘अपरंपरागत उर्जा स्त्रोताचे व्यवस्थापन’, ‘शुद्ध पाणी / घनकचरा व्यवस्थापन’, ‘संसाधन व्यवस्थापनातील विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या संधी’ हे या स्पध्रेचे उपविषय आहेत. प्रत्येक प्रकल्प आणि प्रतिकृती दोन विद्यार्थ्यांना मिळून तयार करता येईल, तर प्रत्येक भित्तीपत्रक केवळ एकाच विद्यार्थ्यांला तयार करावयाचे आहे. तीन बाय दोन फूट असा प्रकल्प, प्रतिकृती आणि भित्तीपत्रकाचा आकार निश्चित करण्यात आला आहे. या प्रकल्प, प्रतिकृती आणि भित्तीपत्रकाची निर्मिती सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांनी स्वत: केलेली असावी आणि ते स्वयंनिर्मित व स्वयंचलित असावे. स्पर्धा आणि प्रदर्शनात सहभागी होण्याकरिता विद्यार्थ्यांकडून तसेच प्रवेशासाठी कोणतेही शुल्क नाही.
‘विज्ञान आणि अभियांत्रिकी प्रदर्शन २०१५’त सहभागी होण्याकरिता नागपूर आणि परिसरातील विज्ञान व अभियांत्रिकी महाविद्यालयांनी त्यांच्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करावे. स्पध्रेत सहभागी होण्याकरिता ७ फेब्रुवारीपर्यंत रामन विज्ञान केंद्राशी संपर्क साधावा, असे संयोजकांनी कळविले आहे. सकाळी ११ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत हे प्रदर्शन सर्वासाठी खुले राहील.