केंद्र सरकार एकात्म भारताच्या अखंडतेचे मारेकरी असल्याचा आरोप करून हिंदू राष्ट्राकडे सुरू असलेल्या सरकारच्या वाटचालीचा जाब विचारण्यासाठी पीपल्स रिपब्लिकन पक्षातर्फे संसदेवर मोर्चा नेण्यात येणार असल्याचे पक्षाचे राष्ट्रीय नेते आमदार जोगेंद्र कवाडे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
नुकत्याच पार पडलेल्या ६६व्या गणराज्य दिनानिमित्त मोदी सरकारने भारतीय संविधानातील ‘धर्मनिरपेक्ष’ आणि ‘समाजवाद’ हे शब्द वगळून प्रसार माध्यमामधून जाहिरात दिली. ती मुळातच भारताच्या एकात्मतेला व अखंडतेला दिलेले आव्हान आहे. संविधानाचे पावित्र्य राखण्याचे, त्याचे संरक्षण करण्याचे अधिकार केंद्र सरकारचे असताना केंद्र सरकारनेच जाणीवपूर्वक संविधानाचा अपमान केला. रा.स्व. संघ, बजरंग दल, विहिंप यांचा हिंदुत्वाचा अजेंडा महत्त्वाचा की देशाची एकात्मता व अखंडता महत्त्वाची, याचा निर्णय मोदी सरकारने घ्यावा आणि आपली व आपल्या सरकारची भूमिका देशहिताच्या बाजूने आहे की देशविघातक आहे, हे स्पष्ट करावे, असेही कवाडे म्हणाले.
शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी याच पाश्र्वभूमीवर ‘धर्मनिरपेक्ष’ व ‘समाजवादी’ या राज्यघटनेतील शब्द वगळण्याची मागणी करून स्वत:च्याच देशभक्तीवर व राष्ट्रनिष्ठेवर प्रश्नचिन्ह उभे केले आहे. त्यांची ही मागणी म्हणजे संविधावरील संकट होय. या संकटाचा जाब विचारण्यासाठी संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झाल्यानंतरच पहिल्या आठवडय़ात संसदेवर मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चात संपूर्ण महाराष्ट्र व अन्य राज्यातून हजारो नागरिक येतील, असेही कवाडे यांनी सांगितले.