मानकापूर येथील ‘रोजीरोटी’शी संबंधित प्रदर्शनाला तरुणाईची गर्दी

तारुण्यातील मौजमजा हा एक तरुणाईचा हळवा, प्रेमळ, नाजूक कोपरा असला तरी कारकीर्दीविषयी आजचा युवा तेवढाच गंभीर आहे.

तारुण्यातील मौजमजा हा एक तरुणाईचा हळवा, प्रेमळ, नाजूक कोपरा असला तरी कारकीर्दीविषयी आजचा युवा तेवढाच गंभीर आहे. महाविद्यालयाला चाट मारून खाजगी शिकवणी वर्ग, सामाईक परीक्षा, नोकऱ्यांसाठीचे अर्ज व अ‍ॅप्टिटुयट चाचण्यांना पेलून आजचा युवा रोजगारासाठी प्रयत्नरत असतो. नोकरीसाठी प्रयत्नशील युवा उद्यमशीलतेसाठीही तेवढाच तत्पर असतो, हे जाणूनच मानकापूर येथील क्रीडा संकुलाच्या परिसरात विदर्भ फॉच्र्युन फाउंडेशनच्यावतीने ‘युवा सक्षमीकरण परिषदे’मार्फत उद्योजक बना किंवा स्वयंरोजगार मिळवा, असे दोन्ही पर्याय प्रदर्शनाच्या माध्यमातून उपलब्ध करून दिले आहेत. हे प्रदर्शन ‘रोजीरोटी’शी संबंधित असल्यानेच तरुण-तरुणींची प्रदर्शनातील उपस्थिती लक्षवेधक ठरली आहे.
तरुण-तरुणींच्या स्वप्नपूर्तीसाठी पूर्ती अल्टर्नेटिव्ह फ्युएल्स प्रा.लि.ने चक्क बॅटरीचलित रिक्षा प्रदर्शनात उभी केली आहे. कदाचित ‘निरोद्योगी राहण्यापेक्षा रिक्षा तरी चालवा’ असा संदेश त्यांना द्यायचा असेल. सायकल रिक्षा आणि ऑटोच्या मधले मॉडेल म्हणजे ही बॅटरीवर चालणारी रिक्षा तरुणांचे लक्ष वेधून घेत आहे.
पूर्तीने केवळ रिक्षाच आणली नाही, तर सोबत बायोमास कांडय़ा (पेलेट्स) आणि पेलेट शेगडय़ाही प्रदर्शनात ठेवल्या असून नागपुरात त्या सर्वत्र उपलब्ध असल्याचे संबंधित स्टॉलधारकांनी सांगितले. शिवाय उद्योग, घरगुती वापरासाठी, हॉटेल किंवा भोजनालयचालकांची गरज ओळखून ६ किलो, १७ किलो आणि ३३ किलोचा सिलिंडरही प्रदर्शन दाखवण्यात आले आहे. बाग, कापूस किंवा फळभाज्यांवर स्प्रे मारून त्यांचा ताजेपणा कायम टिकवण्यासाठी ‘झायमो’ या उत्पादनाबरोबरच कापसाचे ३३४४ हे बियाणे आणि एक बुरशीनाशक अंकुर सिड्सने प्रदर्शनात ठेवले आहे.
या प्रदर्शनातील बरेच स्टॉल रेशिमबागमध्ये भरवण्यात आलेल्या अ‍ॅग्रो-प्रदर्शनातही होते. त्यामुळे लोक तक्रारी करण्यासाठीही स्टॉलवर दिसत होते. बँका, त्यांनी उपलब्ध केलेल्या अत्याधुनिक सेवा, कर्ज योजना आणि बरेच काही सांगणाऱ्या स्टॉल्सबरोबरच वेगवेगळ्या आर्थिक विकास महामंडळांचे स्टॉल्स एकत्र लावण्यात आले होते.
मात्र, पाहिजे त्या प्रमाणात शासन या महामंडळांना निधी उपलब्ध करून देत नसल्याने उद्यमशील तरुणांना त्याचा लाभ नसल्याची खंतही स्टॉलधारकांनी बोलून दाखवली.
सौरऊर्जेपासून बनवण्यात आलेली उपकरणे, शेतातील टाकावू वस्तूंवर प्रक्रिया करून त्याचा पुनर्वापर, वातावरणात तजेला निर्मितीसाठी शेवाळापासून बनवण्यात आलेले सूक्ष्म अन्नद्रव्य अशा नानाविध माहितीने परिपूर्ण असलेले प्रदर्शन पाहून थकल्यास तरुणाईचा मोर्चा वळतो तो बचत गटांकडून बनवण्यात आलेल्या वेगवेगळ्या खाद्यपदार्थाच्या स्टॉलकडे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Nagpur vidarbh news