सोयाबीनला मिळत असलेल्या प्रोत्साहनामुळे देशातील तरुणांचे भविष्य अंधारात असल्याचे मत अकादमी ऑफ न्युट्रिशन इम्प्रोव्हमेंटचे अध्यक्ष डॉ. शांतीलाल कोठारी यांनी व्यक्त केले आहे. कृषी तज्ज्ञांना गाव आणि ग्रामिणांची गरज काय आहे, हे समजण्यास मोठे अपयश आल्याचा आरोपही त्यांनी लावला आहे.
नागपुरात राष्ट्रीय संत्रावर्गीय फळ संशोधन केंद्र, केंद्रीय कापूस संशोधन केंद्र तसेच डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ काम करीत आहेत. या संस्थांचा उद्देश शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणे आणि त्यांच्या आर्थिक प्रगतीला हातभार लावणे हा आहे. यानंतरही नागपुरी संत्रा लुप्त होण्याच्या मार्गावर आहे, तर कापूस उत्पादन करणारा शेतकरी आत्महत्या करण्यास प्रवृत्त होत आहे. संकटाच्यावेळी आधार ठरणारे जवस तेल व लाखोळी डाळीची उत्पादने आज उपेक्षित आहेत. हे वरील संस्था व गलेलठ्ठ पगार घेऊन काम करणाऱ्या तज्ज्ञांचे अपयश असल्याचेही डॉ. कोठारी यांनी म्हटले आहे.
भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या नियंत्रणाखाली काम करीत असलेले कृषी विद्यापीठ, भारतीय आयुर्विज्ञान परिषदेतंर्गत काम करीत असलेली वैद्यकीय महाविद्यालये, भारतीय आयुर्वेद विद्यापीठ, नाशिकच्या नियंत्रणाखाली काम करीत असलेले आयुर्वेद महाविद्यालये व शोधसंस्था देशातील सोयाबीनसारख्या अपचनीय, निरुपयोगी आणि हानीकारक उत्पादने आणि त्याचे शरीरावर पडणाऱ्या चांगल्या वाईट परिणांमाबद्दल जनतेत जागृती निर्माण करण्यास अयशस्वी ठरल्या.
अकादमीच्या वतीने १५ ऑगस्ट २०१३ रोजी अन्नत्याग आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर या संस्थांना जाग आली. यानंतर लगेच आयसीएमआरकेचे महासंचालक डॉ. वी.एम. कटोच व डॉ. एस. अय्यपन यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली. वरिष्ठ पोषण आहार वैज्ञानिक तसेच उपमहासंचालक डॉ. डी.एस. टोटेजा यांना समितीचे सदस्य सचिव बनविण्यात आले. तसेच अकादमी ऑफ न्युट्रिशन इम्प्रुव्हमेंटचे अध्यक्ष व तज्ज्ञ डॉ. शांतीलाल कोठारी, बालरोग तज्ज्ञ डॉ. एच.एस. कापगते यांना सदस्य नियुक्त करण्यात आले. यानंतरही ही समिती सरकारसमोर आपले सत्य मांडण्यास असमर्थ ठरली.
भारतातील जल आणि वायु सोयाबीनचे उत्पादन घेण्यास अनुकूल नाही. नागपुरात निर्मित ‘सोयामी’ सोडून सोयाबीनपासून तयार करण्यात येणारे खाद्यपदार्थ गुणकारी आहेत किंवा नाही याचा पुरावा ग्राहकांना देत नाही. अमेरिकेतील पोषण आहार तज्ज्ञ डॉ. कायला टी. डेनियल यांचे पुस्तक ‘दी होल सोया स्टोरी’ यात त्यांनी जगात करण्यात आलेल्या संशोधनाचा आधार घेऊन काही निष्कर्ष काढले आहेत. त्यात त्यांनी सोयाबीनचे उत्पादन व सेवन मनुष्य तसेच प्राण्यांसाठी हानीकारक असल्याचे स्पष्ट केले आहे. महाराष्ट्र वैद्यक परिषदेचे अध्यक्ष डॉ. किशोर टावरी यांनीसुद्धा या पुस्तकातील निष्कर्षांकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज असल्याकडे लक्ष वेधले आहे. असे असतानाही राज्य सरकारने कुपोषण निर्मूलन कार्यक्रमात सोयाबीन व सोयाबीनपासून तयार केलेल्या पदार्थांचा समावेश केला आहे.
सोयाबीनमध्ये प्रोटीन, खनिज आणि अन्य जीवनसत्वे असल्याचा त्यामागे निर्वाळा दिला जातो. परंतु सोयाबीन व त्यापासून तयार केलेल्या पदार्थाच्या सेवनामुळे कर्करोग, हृदयविकार, मेंदूचे आजार, फुफ्फुस व मूत्रपिंडावर त्याचे परिणाम होत असल्याचे याबाबत प्रकाशित करण्यात आलेल्या शोधपत्रात म्हटले आहे. या समस्येवर उपाय म्हणजे सोयाबीनची शेती व सोयाबीनचा आहारतील उपयोग बंद करणे तसेच नैसर्गिक साहित्यातून तयार करण्यात आलेला आहार हाच असल्याचे डॉ. कोठारी यांनी म्हटले आहे.