राज्यस्तरीय शासन पातळीवरील सेवानिवृत्त वनकर्मचाऱ्यांच्या अडीअडचणी सोडविण्याच्या दृष्टिकोनातून चर्चेसाठी तारीख व वेळ मिळावी म्हणून महाराष्ट्र वनसेवानिवृत्त असोसिएशन यांच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन सादर केले. यात विविध मागण्यांचा समावेश आहे.
सेवानिवृत्तांना वैद्यकीय सवलती मिळाव्यात. वनकर्मचाऱ्यांना जीवनात एकदा शासकीय दराने लाकूडफाटा मिळावा. सेवानिवृत्ताच्या मुलामुलींना योग्यतेनुसार नोकरी मिळावी. वैदर्भीय जनतेला मुंबईचे हेलपाटे मारावे लागू नये म्हणून, मुख्यमंत्र्यांचे मिनी कार्यालय नागपूरला असावे. कालबद्ध पदोन्नतीचा १ जुलै २०११चा जीआर रद्द करावा. नक्षलग्रस्त भागातील कर्मचाऱ्यांकडून होणारी शासकीय वसुली ताबडतोब थांबवावी. नागपूर, ठाणे, गडचिरोली व चंद्रपूर वृत्तातील सेवानिवृत्त ज्येष्ठ वनपालावर पदोन्नतीबाबत झालेला अन्याय दूर करावा आदी मागण्यांचा यात समावेश आहे.
वनसेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत चर्चा करण्यासाठी लवकरात लवकर वेळ देण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले. तसेच संघाच्या औरंगाबाद येथील अधिवेशनाचे उद्घाटन करण्याचे आश्वासनसुद्धा त्यांनी दिले. यावेळी शिष्टमंडळात संघाचे केंद्रीय अध्यक्ष चंद्रकांत चिमोटे, महासचिव विनोद देशमुख, नागपूर वृत्त अध्यक्ष एम.ए. अकील, वृत्त सचिव आर.बी. पातेवार, केंद्रीय सचिव आर.पी. दाढे, आर.के. ठवसे, सी.एच. मानापूरे, संभाजी आसोले, एस.डब्ल्यू. राजूरकर, चव्हाण आदी प्रतिनिधी उपस्थित होते.