लोकसभा निवडणुकीपाठोपाठ विधानसभेच्या निवडणुकीदरम्यान राजकीय पुढाऱ्यांनी मारलेल्या कोलांटउडय़ा, जिल्हा परिषद आणि महापालिकेतील बदललेले सत्ताकारण, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, अपघातांचे सत्र, सांस्कृतिक आणि कलाक्षेत्रातील अनेक घडामोडींनी यंदाचे वर्ष गाजले.
बडनेरा रेल्वेस्थानकाजवळ रस्त्याच्या कडेला झोपलेल्या पारधी समुदायातील लोकांना एका भरधाव गाडीने चिरडले. वर्षांरंभीच घडलेल्या या दुर्घटनेत ५ जण ठार झाले. तीन चिमुकल्यांच्या मृत्यूने हळहळ व्यक्त झाली. परतवाडा येथे एका दुकानाला लागलेल्या आगीच्या ज्वाळा वरच्या मजल्यावरील घरापर्यंत पोहोचल्या आणि गोठवाल कुटुंबीयातील पाच सदस्यांना बाहेर पडण्याचीही उसंत आगीने दिली नाही. यात पाच जण दगावले.
अनेक लहान मोठय़ा अपघातांनी जिल्ह्यातील अनियंत्रित वाहतुकीचा चेहरा उघड केला.
रहाटगावनजीक निर्जन स्थळी एका युवतीवर झालेल्या सामूहिक बलात्काराच्या घटनेनंतर अनेक सामाजिक संघटना त्याविरोधात एकवटल्या. वर्षअखेरीस तपोवन बालगृहातील अल्पवयीन मुलींच्या लैंगिक शोषणाचा मुद्दाही समाजमन ढवळून काढणारा ठरला.
राजकीय पटलावर अनाकलनीय घडामोडी घडल्या. काँग्रेसमध्ये परतण्याची वाट पाहतानाच माजी राज्यमंत्री डॉ. सुनील देशमुख यांनी भाजपची वाट धरली. त्यांना आमदारकी मिळाली. लोकसभा निवडणुकीच्या वेळी बंड पुकारणारे राष्ट्रवादीचे तत्कालीन प्रदेश सरचिटणीस संजय खोडके यांनी काँग्रेसची साथ घेतली. बडनेरातून सुलभा खोडके यांना मात्र पराभव पत्करावा लागला. खोडके गटाने महापालिका आणि जिल्हा परिषदेतील सत्तासूत्रे मात्र आपल्या गटाच्या ताब्यात ठेवण्यात यश मिळवले. माजी राज्यमंत्री वसुधा देशमुख, सुरेखा ठाकरे, साहेबराव तट्टे, राजकुमार पटेल या नेत्यांनी ऐनवेळी केलेले पक्षबदल मतदारांना अवाक करणारे ठरले. दोन नवख्या उमेदवारांना आमदारकीची लॉटरीही लागली. काही दिग्गजांना पराभवाचा धक्का बसला.
पूर्णा नदीच्या पुरामुळे काही गावांना बसलेला तडाखा अजूनही विस्मरणात गेलेला नाही.
डॉक्टरांच्या संपामुळे रुग्णांचे झालेले हाल, धनगर समाजाचा आरक्षणाच्या मागणीचा मोर्चा, त्याविरोधात आदिवासींनी केलेली निदर्शने, धनगर समाजाच्या, तसेच आदिवासी   नेत्यांनी  केलेली आक्रमक भाषणे अमरावतीकरांनी अनुभवली.
शैक्षणिक क्षेत्रातही अनेक घडामोडींनी लक्ष वेधले. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मोहन खेडकर यांच्यावर कन्येच्या गुणवाढ प्रकरणाचे बालंट आले. दोन चौकशी समित्यांनी त्यांना क्लिन चिट दिली, पण विद्यार्थी संघटनांच्या आंदोलनाचा आणि सक्तीच्या रजेचा सामना त्यांना करावा लागला.
अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी अमरावतीकरांना मिळाली.
क्रीडाक्षेत्रातही वेगवान घडामोडी होत्या. अनेक खेळाडू राष्ट्रीय पातळीवर चमकले.
सरत्या वर्षांत काही गोड आणि काही कडू आठवणी आहेत, पण सर्वाधिक स्थित्यंतरे राजकीय क्षेत्रात झाली. त्याचा प्रभावही स्थानिक राजकारणावर दीर्घकाळ जाणवणार आहे.