चित्र रंगवण्यात चिमुकले दंग

चिमुकल्यांपासून तर दहावीच्या उंबरठय़ावर असलेल्या विद्यार्थ्यांचा सकाळी आठ वाजतापासूनच ओघ सुरू झालेला होता.

चिमुकल्यांपासून तर दहावीच्या उंबरठय़ावर असलेल्या विद्यार्थ्यांचा सकाळी आठ वाजतापासूनच ओघ सुरू  झालेला होता. दोन, चार, पाच, दहा असे करता करता आधी शेकडो आणि मग हजाराचा टप्पाही या विद्यार्थ्यांनी ओलांडला. शाळेची पायरी ओलांडणाऱ्यांसोबत त्यांचे पालक तर कनिष्ठ महाविद्यालयाच्या पायरीवर पाऊल ठेवण्यास एक वर्षांचा अवकाश असलेल्या विद्यार्थ्यांसोबत शिक्षक असा जत्था सामावून घेण्यासाठी रामन विज्ञान केंद्राचा परिसर कमी पडला. विज्ञान दिनानिमित्त आयोजित चित्रकला स्पध्रेत सहभागी होण्यासाठी आलेल्या विद्यार्थ्यांची संख्या केंद्रासाठीही अचंभित करणारी होती, पण विद्यार्थ्यांच्या उत्साहाने अलोट गर्दीतही अगदी व्यवस्थितपणे ही स्पर्धा पार पडली.
राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त आणि रामन विज्ञान केंद्राच्या स्थापनादिनानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. या कार्यक्रमाचाच एक भाग म्हणून शुक्रवारी पहिली ते नववीच्या विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धा घेण्यात आली. तीन गटात आयोजित ही स्पर्धा आयोजित केली होती. पहिली ते चौथीच्या पहिल्या गटासाठी माझा आवडता प्राणी, माझी हिरवीगार शाळा आणि स्वच्छ भारत अभियान हे विषय देण्यात आले होते. यावेळी पहिली व दुसरीच्या विद्यार्थ्यांची लगबग पाहण्यासारखी होती. तल्लीन होऊन हे चिमुकले विद्यार्थी प्राणी, शाळा काढण्यात दंग झाले होते. तर काही स्वच्छ भारताचे चित्र रंगवण्यात दंग झाले होते. पाचवी ते सातवीच्या दुसऱ्या गटासाठी हमारा मंगलयान, विज्ञान बागेत मी आणि स्वच्छ भारत अभियान हे विषय होते. त्यांच्या आकलन शक्तीनुसार चित्र काढण्यात आणि त्यात रंग भरण्यात ते तल्लीन होते. आठवी ते नववीच्या तिसऱ्या गटासाठी देशाच्या विकासासाठी विज्ञान, बेटी बचाओ, सर सी.व्ही. रामन हे विषय होते.   सुमारे तीन हजार विद्यार्थी या स्पध्रेत सहभागी झाले होते.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व नागपूर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Nagpur vidarbh news

ताज्या बातम्या