चिमुकल्याचा नरबळी, शतकातील दुष्काळ, राजकीय धृवीकरण, वाढत्या घरफ ोडय़ा, प्रशासनातील शीतयुध्द, अशा ठळक घटनांनी वर्धेकरांना २०१४ ची आठवण राहणार आहे. मात्र, नरबळीच्या घटनेने जिल्ह्य़ाची अंधश्रध्दाळू प्रतिमा देशभर पोहोचल्याने या गांधी जिल्ह्य़ाला कायमचा कलंक लागला. गुप्तधनासाठी शिक्षकांसह पाच आरोंपींनी रूपेश मुळेची केलेली थरारक हत्या, हा माणूसकीलाच कलंक ठरला. अंधश्रध्दा निर्मूलनाच्या कार्यात दोन मजबूत संघटना जिल्ह्य़ात असल्याने या संघटनेच्या कार्यावरच नागरिकांनी प्रश्न उपस्थित केला.
पूर्व विदर्भात सर्वाधिक कमी आणेवारी वर्धा जिल्ह्य़ाची असल्याचे अहवालातून दिसून आले. संपूर्ण गावात ५० टक्क्याच्या आत पैसेवारी असल्याचे भयंकर सत्य उमटले. सलग तीन वर्षांनंतरची ही स्थिती जिल्ह्य़ाचा दुष्काळाबाबत इतिहास निर्माण करून गेली. त्यादृष्टीने २०१४ हे वर्ष शेतकऱ्यांच्या कायमचे स्मरणात राहील. याच वर्षांत दुष्काळाबाबत शासनाचा दृष्टीकोण शेतकऱ्यांना संतप्त करणारा ठरला. शेतकरी नेत्यांनी प्रथमच या प्रश्नावर पदयात्रा काढून थेट मुख्यमंत्र्यांना जाब विचारला. नेहमीप्रमाणेच आश्वासनांचा पाऊस पडला, पण किसान अधिकार अभियानाचे पाऊल शेतकऱ्यांना दिलासा देणारे ठरले.
वर्षभरात १४३ घरफ ोडय़ा करून चोरटय़ांनी चांगलाच धुमाकूळ घातल्याचे सरतेशेवटी दिसून आले. शहरालगतच्या नव्या वसाहतीत चार ते पाच आरोपींनी शस्त्रानिशी सातत्याने धुमाकूळ घातला. वर्षांतील तीन महिने नागरिकांनी रात्र जागून काढून स्वरक्षण केले. महिला, वृध्द, मुले सगळे भयचकित झाल्याचे या काळात दिसून आले. आरोपींचा अद्याप थांगपत्ता न लागल्याने पोलिसांना सरत्या वर्षांचे आव्हान नव्या वर्षांतही पुरणार आहे.
लोकसभा व विधानसभा निवडणुकांमुळे २०१४ या वर्षांने दिलेले निकाल आगामी चार वर्षांसाठी उत्सुकतापूर्ण ठरणार आहे. वध्र्यात व हिंगणघाटात प्रथमच कमळ फु लले. जिल्हा कमळमय करण्याचे दत्ता मेघेंचे स्वप्न नगरपालिका व जिल्हा परिषदेवर भाजपची सत्ता आल्याने पूर्ण झाले. मेघेंचा राजकीय प्रवास १८० कोनातून फि रल्याचा इतिहास त्यांच्या पक्षांतराने या वर्षांतच निर्माण झाला. पुत्र व शिष्यास आमदार करून मेघेंनी मिडास टच दाखवून दिला. शिवसेना व राष्ट्रवादीचे पानीपत झाले. मोदी लाटेत राकॉंचे धुरंधर पालापाचोळ्यागत उडाले. जिल्हा बंॅकेचा त्रस्त करणारा प्रश्न वर्षांअखेरीस सुटण्याची आशा केंद्राच्या निर्णयाने निर्माण झाली, पण २०१४ चा हा सोपस्कार २०१५ मध्ये तरी पूर्ण होणार काय, हा प्रश्न आहेच.
शेतकऱ्यांना अधिकच गर्तेत टाकणाऱ्या २०१४ ने राजकीय नवनेतृत्वाला मात्र संजीवनी दिल्याने कडूगोड अनुभवांचे गाठोडे सोडून वर्ष चालते झाले. ग्रामपंचायत हद्दीतील बांधकामाच्या परवानगीचा मुद्या निकालात निघाल्याने हजारो नागरिकांचे घर बांधण्याचे स्वप्न नववर्षांच्या उंबरठय़ावर साकारणार आहे. शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक व धार्मिक सभा-संमेलनाने सरत्या वर्षांत वर्धेकरांना आनंदाचेही क्षण दिले, हेही नसे थोडके.