कर्तृत्वाने नव्हे तर जन्माने श्रेष्ठत्व बहाल करणाऱ्या जातीव्यवस्थेचे पोकळत्व सिद्ध करून मूळ भारतीय  असलेल्या बौद्ध धम्माचा स्वीकार करणारे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा राष्ट्रवाद वादातीत असताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आंबेडकरी विचाराची नव्याने मांडणी करण्याचा प्रयत्न करीत आहे, असे मत आंबेडकरी अभ्यासकांनी व्यक्त केले आहे.
डॉ. आंबेडकरांनी राष्ट्रहित आणि समाजहित साध्य करण्यासाठी वेळोवेळी विचारात लवचिकता ठेवली आहे. त्यामुळे त्यांच्या ग्रंथाचे वाचन करणारे त्या काळातील घटनांचे विश्लेषण शब्दाश: करून समाजात संभ्रम निर्माण करीत आहेत किंबहुना हे जाणिवपूर्वक केले जात आहे, असा सूर काही विचारवंतांनी आवळला आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्तराष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुखपत्र पांचजन्य आणि ऑर्गनायजर विशेषांक काढणार आहे. त्यासंदर्भातील वृत्त बाहेर आले आहे. डॉ. आंबेडकर यांचे ‘घरवापसी’ला समर्थन होते आणि ते हिंदूविरोधी नव्हते, असे वृत्त प्रकाशित करण्यात आले आहे. आंबेडरवाद्यांनी विरोध केला तर ते हिंदू विरोधी ठरतील आणि समर्थन केल्यास संघाच्या सामाजिक समरसतेला बळ मिळेल, असा दुहेरी हेतू आहे, असे विचारवंताचे मत आहे. या पाश्र्वभूमीवर काही अभ्यासकांनी डॉ. आंबेडकर यांच्या विविध पैलूंवर मत मांडले.
आर्थिक विचार
डॉ. बाबासाहेब आंबडेकरांनी १९३५ मध्ये पंडित जवाहरलाल नेहरू यांना राज्यघटनेचे प्रारूप दिले होते. त्यात प्रत्येक भारतीयाला अन्न आणि जीवन जगण्याचा अधिकार देण्याचे सूत्र मांडले आहे. प्रत्येकाला पोटभर अन्न देण्यासाठी सरकारने यासाठी लागणारे उद्योग स्वतच्या ताब्यात ठेवले पाहिजे. अवजड उद्योग आणि नैसर्गिक स्रोतदेखील आपल्याकडे ठेवावे. देशातील नागरिकांना अन्न सुरक्षा देताना सरकारला कदाचित तोटा सहन करावा लागेल. परंतु अवजड आणि नैसर्गिक स्रोतातील उत्पन्नामुळे सरकार प्रचंड नफ्यात राहील, असे बाबासाहेबांचे मत होते. या देशात मात्र अगदी उलटे चक्रफिरत आहे. कोटय़वधी लोकांना दोन वेळचे जेवणे मिळले की नाही याची शाश्वती नाही. शेतकरी आत्महत्या करीत आहेत. जीवन जगण्याचा हक्क डावलण्यात आला आहे. सरकारकडून अवजड उद्योग तसेच नैसर्गिक स्रोत खासगी कंपनीला दिले जात आहे. अशा धोरणामुळे  आर्थिक विषमतेला गती मिळत आहे, असे डॉ. बाबासासाहेब आंबेडकर मिशनचे प्रा. डॉ. एस.के. गजभिये म्हणाले.
सामाजिक विचार
भारतीय सामाजिक व्यवस्था ही विषमतेवर आधारित आहे. विशेष म्हणजे ही विषमता जातीवर आधारित आहे. व्यक्तीचा जन्म ज्या जातीमध्ये झाला त्याच जातीचा सामाजिक दर्जा व्यक्तीला मिळतो. विषमतावादी जाती व्यवस्था आणि अस्पृश्यतेला डॉ. आंबेडकरांनी कडाडून विरोध केला. त्यांनी आदर्श समाजाबद्दल स्पष्ट कल्पना मांडली. त्यांच्या मते स्वातंत्र्य, समता, बंधूता आणि न्याय या मूलभूत मानवी मूल्यावर आदर्श समाजाची निर्मिती झाली पाहिजे म्हणून त्यांनी जाती व्यवस्थेचे विश्लेषण, निर्मूलन करण्यासाठी भारतातील जाती, जाती व्यवस्थेचे निर्मूलन, पूर्वी शूद्र कोण, अस्पृश्य मुळचे कोण इत्यादी ग्रंथ लिहिले. भारतातील प्रत्येक व्यक्तीला समान हक्क आणि समान न्याय मिळणे आवश्यक आहे, तरच समाजाचा आणि देशाचा विकास होईल. भारतात लोकशाही रुजविण्यासाठी मानवी मूल्यावर आधारित समाज व्यवस्था असणे आवश्यक आहे. इतकेच नव्हेतर विषमतावादी समाज व्यवस्था नष्ट करण्यासाठी त्यांनी जाती व्यवस्था आणि विषमतावादी धार्मिक मूल्य व परंपरा नष्ट करण्यासाठी सामाजिक चळवळ उभारली होती, असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन केंद्राचे प्रमुख प्रा. डॉ. प्रदीप आगलावे म्हणाले.
राजकीय विचार
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे राजकीय विचार पूर्णपणे ईहवादी होती. राजकीय सत्ता धर्म केंद्रित त्यांना नको होती. ते लोकशाहीचे पुरस्कर्ते होते. समता, स्वातंत्र आणि बंधूता ही लोकशाहीची तत्त्वे भारतात प्रस्थापित व्यवस्थेत नव्हती. ही मूल्ये रुजविण्यासाठी ईहवादी तत्त्वज्ञानाचा स्वीकारा त्यांनी केला होता. येथील दलित, पीडित, शोषित, असंघटीत कामगार, महिला यांना लोकशाहीच्या माध्यमातून राष्ट्राच्या, समाजाच्या मुख्य प्रवाहात सामील करून घ्यायचे होते. त्यासाठी राजकीय सत्ता त्यांना हवी होती. लोकशाही सदृढ, परिपक्व, विकसित झाली पाहिजे, असे त्यांचे आग्रही मत होते. लोकशाही एक पक्षीय कधीच असू नये. त्याचा सर्व प्रकारच्या एकाधिकारशाहीला विरोध होता. लोकशाहीचे ते खंदे पुरस्कर्ते होते, परंतु ते लोकशाहीवर डोळे झाकून विश्वास करीत नव्हते. लोकशाहीपासून नेहमी सावध राहिले पाहिजे, कारण जगात लोकशाहीतून हुकूमशाहीने जन्म घेतला आहे, असे बाबासाहेबांचे मत होते, असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचारधारा विभागाचे प्रा. डॉ. रमेश शंभरकर म्हणाले.
धार्मिक विचार
बाबासाहेबांना मानवी मनाची जोपसना करणारे धर्म हवे होते. धर्माने जगाचे केवळ अहित केले आहे. धर्माचा मूलतत्त्व वाद केव्हा उफाळून येईल. याचा काही नेम नसतो. परंतु बौद्ध धम्माने कधीच कुणाचे अहित केले नाही. धम्माचा केंद्रबिंदू माणूस आणि त्याचे कल्याण आहे. धम्म हे बुद्धाचे स्वतंत्र संशोधन आहे. तो माणसाच्या सुख दुखाशी संबंधित आहे. धर्माला बऱ्या आणि वाईट दोन्ही गोष्टी आहेत. धम्माचे तसे नाही. जो त्याचे पालन करेल त्याचे कल्याणच होईल. यामुळे बाबासाहेबांनी धम्माचा स्वीकार केला. भविष्यात केवळ विज्ञानावर आधारित धम्माचे अस्तित्व टिकेल.
आंधळ्या गोष्टीवर असलेला धर्म नष्ट होईल. बौद्ध धम्म नीती तत्त्वावर आधारलेला आहे. त्याला काळी बाजू नाही. त्याच्या आचारणाने प्रकाश मिळेल, असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचारधारा विभागाचे प्रा. डॉ. सुभाष नगराळे म्हणाले.