मुदतबाह्य़ ऑटोरिक्षा रस्त्यावर..

उपराजधानीतील बहुतांश ऑटोरिक्षा मुदतबाह्य़ झाले असून तसेच ऑटोरिक्षांची स्थिती प्रवास करण्याजोगी नाही

उपराजधानीतील बहुतांश ऑटोरिक्षा मुदतबाह्य़ झाले असून तसेच ऑटोरिक्षांची स्थिती प्रवास करण्याजोगी नाही, या वस्तुस्थितीकडे वारंवार दुर्लक्ष केले जात आहे. १९९७ पासून नवीन ऑटोंना परमीट देण्यात आले नसल्याने मुदतबाह्य़ व नादुरुस्त ऑटोरिक्षा शहरात सर्वत्र फिरत असून ऑटोरिक्षांचे चालक-मालक त्याच्या देखभालीकडे मुळीच लक्ष देत नसल्याने अत्यंत धोकादायक स्थितीत प्रवाशांना प्रवास करावा लागत असल्याचे दिसत आहे.
असंख्य ऑटो चालविण्यासाठी ‘फिट’ नाहीत तरीही बिनधास्तपणे रस्त्यांवरून धावत असून प्रवाशांचा जीव टांगणीवर ठेवत आहेत. शाळकरी विद्यार्थ्यांची वाहतूक करणारे ऑटोदेखील धोकादायक अवस्थेतील आहेत. फिटनेस प्रमाणपत्रासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयात जाण्यापेक्षा ऑटोचालक जास्तीत जास्त फे ऱ्या करून पैसा कमावण्याच्या मागे लागले आहेत. अनेक ऑटोंचे फक्त सांगाडे उरले असतानाही ऑटोंना रस्त्यावरून धावण्यासाठी कशी परवानगी दिली जाते, याचे गूढ सामान्य प्रवाशाला उलगडलेले नाही. शहरातील सरासरी १०० पैकी ६० ऑटो अत्यंत वाईट स्थितीत आहेत आणि त्यांच्या दुरुस्तीची गरज आहे. शहरात प्रादेशिक परिवहन विभागाकडून अधिकृत परवानगी मिळालेले ९२५५ ऑटो चालविले जात आहेत. त्यापैकी ५५०० ऑटोची योग्यता प्रमाणपत्रासाठी (फिटनेस टेस्ट) आले नसल्याची धक्कादायक माहिती उघड झाली असून अनधिकृतपणे धावणाऱ्या ऑटोंची संख्या पाहता हा आकडा आणखी वाढला आहे. असे ऑटो प्रवाशांच्या जीविताला धोका निर्माण करणारे ठरू लागले आहेत. परंतु, संबंधित यंत्रणा त्याकडे पूर्णपणे कानाडोळा करीत असल्याने त्यांची दादागिरी आता सहनशक्तीच्या पलीकडे चालली आहे.
मोटार वाहन कायदा १९८८ नुसार प्रत्येक ऑटोला परिवहन विभागाचे फिटनेस प्रमाणपत्र दरवर्षी मिळवावे लागते. नव्या वाहनांना यासाठी दोन वर्षांची सूट आहे. तीन चाकी ऑटोला फिटनेस प्रमाणपत्र चाचणीसाठी परिवहन निरीक्षकाने किमान २ किलोमीटपर्यंत चालवून पाहिले पाहिजे. यादरम्यान मीटर, ब्रेक्स, रिफ्लेक्टर, हेडलाईट्स, इंडिकेटर आणि प्रवाशांसाठी आसनांची सुयोग्य व्यवस्था याचीही तपासणी अपेक्षित आहे. असंख्य ऑटो अत्यंत वाईट स्थितीत असतानाही चालविले जात असल्याने प्रवाशांना धोकादायक प्रवास करावा लागत असल्याचे स्पष्ट आहे. यासंदर्भात काही ऑटोचालकांशी संपर्क साधला असता वाहनाचे विमा शुल्क आवाक्याबाहेरचे असल्याने ऑटोचालक फिटनेस प्रमाणपत्र घेणे टाळत असल्याची बाब पुढे आली आहे. काही शेजारी जिल्ह्य़ातील ऑटोदेखील नागपुरात धावतात, मग त्यांच्यावर कारवाई का केली जात नाही, असा एका ऑटोचालकाचा प्रश्न होता.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व नागपूर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Nagpur vidarbh news

ताज्या बातम्या