‘न्यायदेवतेचे डोळे-कान म्हणजे सामान्य जनता’

न्यायदेवतेचे डोळे व कान म्हणजे घटनेची साक्षीदार असलेली सामान्य जनता आहे. न्यायदेवतेला सर्व नागरिक समान आहेत.

न्यायदेवतेचे डोळे व कान म्हणजे घटनेची साक्षीदार असलेली सामान्य जनता आहे. न्यायदेवतेला सर्व नागरिक समान आहेत. न्यायदानात पक्षपात होऊ नये म्हणून न्यायदेवतेच्या डोळ्यावर पट्टी आहे. सामान्य नागरिकांनी दिलेल्या साक्षीने तिच्या हातातल्या पारडय़ात पुरावे गोळा होत असतात व न्याय मिळत असतो, तेव्हा सामान्य जनतेने कोणत्याही दडपणाविना नि:पक्ष साक्ष दिल्यास न्यायप्रक्रिया सुलभ व जलद होऊ शकते, असे प्रतिपादन मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्या. पी.बी. धर्माधिकारी यांनी केले.
युवा रुरल या संस्थेतर्फे विधि स्वयंसेवकांचे चार दिवसीय प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. या शिबिराच्या उद्घाटन सत्रात अध्यक्षस्थानाहून ते बोलत होते. शिबिराचे उद्घाटन विदर्भ महिला वकील संघटनेच्या माजी अध्यक्ष अ‍ॅड. तेजस्विनी खाडे यांच्या हस्ते पार पडले. युवा रुरलचे कार्यकारी संचालक दत्ता पाटील, सामाजिक कार्यकर्त्यां मृणाल मुनिश्वर प्रामुख्याने उपस्थित होते. न्या. धर्माधिकारी म्हणाले, १९४७ पर्यंत विविध राजवटीच्या काळात आपल्या देशाने एकांगी न्याय अनुभवला. ही व्यवस्था झुगारून समान न्यायासाठी देशातील शीर्षस्थ विचारवंतांनी घटना निर्माण केली. ही घटना देशातील प्रत्येक नागरिकांची आहे. तिचा आदर व अंमलबजावणीसुद्धा प्रत्येक नागरिकांनी करणे आवश्यक आहे. अनेक घटनांमध्ये साक्षीदारांचा अभाव असतो. मग पुराव्याअभावी प्रकरण निकाली लागण्यास विलंब होतो. त्यातही लोकसंख्येच्या तुलनेत न्यायधीशांची संख्या कमी असल्याने ताणही वाढला आहे. तेव्हा विधि स्वयंसेवकांनी निष्ठेने व जागरुक होऊन कार्य केल्यास सामान्य माणसाला न्याय मिळणे सहजसाध्य होईल, अशी आशाही न्या. धर्माधिकारी यांनी व्यक्त केली.
विधि स्वयंसेवक हा स्वेच्छेने काम करणारा असावा, असे सांगतानाच कायदा जरी सरकार करीत असले तरी अंमलबजावणी ही नागरिकांकडून व्हायला हवी, असे अ‍ॅड. तेजस्विनी खाडे म्हणाल्या. व्हिक्टीम कॅम्पसेशन स्किमसाठी मोठा लढा द्यावा लागला तो यशस्वी झाला. आता निधीही उपलब्ध आहे, परंतु त्याची मागणीच व्हिक्टीमकडून होत नाही. याचे मुख्य कारण म्हणजे जाणीव-जागृती नाही, हे होय. तेव्हा विधि स्वयंसेवकांनीच कायदा तुमच्या दारी अथवा कायदा घरोघरी हे सरकारी धोरण सर्वदूर पोहचवावे, असे आवाहनही त्यांनी
केले.
दत्ता पाटील यांनी प्रास्ताविकातून कार्यक्रमाची भूमिका विशद केली. घटनेने दिलेल्या अधिकारांची प्रथम माहिती करून घेणे, हे कार्यकर्त्यांकरिता महत्त्वाचे असल्याचेही ते म्हणाले. युवा रुरलच्या कार्यक्रम समन्वयक ज्योती नगरकर यांनी संचालन करून आभार मानले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Nagpur vidarbh news