सुरक्षित आणि प्रभावी उपचार पद्धतीमुळे लोक होमिओपॅथीकडे वळत आहेत. या पॅथीला आणखी समोर नेण्यासाठी होमिओपॅथीच्या प्रत्येक डॉक्टरांनी सखोल अभ्यास करण्याची गरज आहे, असे मत शहरातील प्रसिद्ध होमिओपॅथीतज्ज्ञ डॉ. विलास डांगरे यांनी व्यक्त केले.
होमिओपॅथिक मेडिकल असोसिएशन ऑफ इंडिया, नागपूर शाखेच्या वतीने डॉ. सॅम्युअल हॅनिमन यांच्या २६०व्या जयंतीचा कार्यक्रम धंतोली येथील देवी अहल्या मंदिर येथे आयोजित करण्यात आला होता. यावेळी अध्यक्षस्थानाहून ते बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून महापौर प्रवीण दटके होते. याप्रसंगी डॉ. राजन काळबांडे, डॉ. मुरलीधर इधोळे, डॉ. रमाकांत कापरे, डॉ. शिरीष चावजी, कवी प्रा. ज्ञानेश्वर वाकुडकर व्यासपीठावर उपस्थित होते. याप्रसंगी भंडाराचे डॉ. भास्कर शेळके, वर्धेचे डॉ. दत्ता कुंभारे, नागपुरातील डॉ. नीला नांदेडकर यांचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
नागपूर मेडिकल हब होत आहे. त्या दृष्टीने होमिओपॅथीला आणखी समोर नेण्यासाठी शहरात होमिओपॅथी डॉक्टरांच्या संघटनेच्या कार्यालयासाठी जागा उपलब्ध करून दिली जाईल, अशी ग्वाही महापौर प्रवीण दटके यांनी याप्रसंगी दिली. होमिओपॅथी आजाराला बरे करत नाही तर आजारी रुग्णाला बरे करते. आपल्याकडे येणाऱ्या गंभीर आजाराच्या रुग्णाला बरे करीत नाही, तोपर्यंत आपल्या पॉथीवरील विश्वास वाढणार नाही, असे मत डॉ. दत्ता कुंभारे यांनी सत्काराला उत्तर देताना व्यक्त केले. होमिओपॅथीच्या औषधाने उशिरा लाभ मिळतो, हा चुकीचा प्रचार थांबवण्याचे आवाहनही त्यांनी याप्रसंगी केले.
याप्रसंगी अन्य मान्यवरांनीही आपले विचार मांडले. संचालन डॉ. अमोल खोंडे यांनी केले तर डॉ. रमाकांत कापरे यांनी आभार मानले. याप्रसंगी संघटनेच्या अध्यक्षा डॉ. स्मिता ढोबळे, सचिव डॉ. योगेश डोये, कोषाध्यक्ष डॉ. अनंत रेवतकर, डॉ. शिरिष चावजी यांच्यासह शहरातील होमिओपॅथी तज्ज्ञ मोठय़ा संख्येने प्रामुख्याने उपस्थित होते.