scorecardresearch

चंद्रपूर जिल्ह्यतील ५५ आदिवासी आश्रमशाळा व वसतिगृहांची दुरवस्था

विविध संस्थांच्या माध्यमातून संचालित जिल्हय़ातील ५५ आदिवासी आश्रमशाळा आणि मागासवर्गीय मुलांच्या वसतिगृहांची अवस्था अतिशय

विविध संस्थांच्या माध्यमातून संचालित जिल्हय़ातील ५५ आदिवासी आश्रमशाळा आणि मागासवर्गीय मुलांच्या वसतिगृहांची अवस्था अतिशय दयनीय झाली असून विद्यार्थ्यांना दोन वेळच्या जेवणासोबतच चहा, नास्ता, पिण्याचे शुद्ध पाणी, आंघोळीसाठी पाणी, तेल, साबणासोबतच तेल, मीठ व भातही मिळत नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या आश्रमशाळा म्हणजे संस्था संचालकांसाठी पैसा कमावण्याचे एक साधन आहेत. दरम्यान, कारवा आश्रमशाळेत विद्यार्थ्यांच्या मृत्यूनंतर उच्चस्तरीय चौकशी सुरू केली आहे.
कारवा येथील खेमाजी नाईक आश्रमशाळेत अशुद्ध पाणी पिल्याने गणेश रूत्तम शिंदे (१३) या आठव्या वर्गातील विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला तर ४० विद्यार्थ्यांना डायरीयाची लागण झाल्यानंतर त्यांना बल्लारपूर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले आहे. या आश्रमशाळेत विद्यार्थ्यांसाठी शुद्ध पिण्याचे पाणी नाही.
असंख्य गैरसोयी असल्यामुळेच विद्यार्थ्यांना डायरीयाची लागण झाल्याचे जिल्हा समाज कल्याण विभागाने केलेल्या प्राथमिक तपासणीतून समोर आले आहे. केवळ ही एकमेव आश्रमशाळाच नाही तर जिल्हय़ात एकात्मिक आदिवासी विभागांतर्गत येणाऱ्या २६ व समाज कल्याण विभागांतर्गत येणाऱ्या २९ अशा ५५ आदिवासी आश्रमशाळांची अवस्था अतिशय दयनीय असल्याची धक्कादायक माहिती या प्रकरणानंतर समोर आली आहे.
 विविध संस्थांच्या माध्यमातून या आश्रमशाळा संचालित केल्या जात आहेत. मात्र शाळेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना दोन वेळचे चांगले जेवणसुद्धा येथे मिळत नसल्याचे पाहणीतून समोर आले आहे. अळय़ांची लागण झालेले गहू, तांदूळ, पाण्याचे वरण, भाजीत तिखट मीठ नाही, अध्रेकच्चे जेवण दिले जात असल्याच्या तक्रारी समाज कल्याण व आदिवासी विभागाकडे विद्यार्थ्यांनी केलेल्या आहेत. परंतु संस्था चालकांवर कधीच कारवाई झालेली नाही.
आश्रमशाळांमध्ये वॉटर फिल्टरचे पाणी विद्यार्थ्यांना द्या तसेच आंघोळीसाठी गिझर किंवा अन्य साधनांचा वापर करण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आलेले आहेत. मात्र बहुतांश आश्रमशाळांमध्ये अशुद्ध पिण्याचे पाणी मिळते. त्याचा परिणाम विद्यार्थ्यांचा मृत्यू होतो. तर बहुतांश शाळांमध्ये थंड पाण्यानेच विद्यार्थ्यांना आंघोळ करावी लागते. अशा स्थितीत समाज कल्याण व आदिवासी विभागाकडून संस्था संचालकांविरुद्ध कारवाईची अपेक्षा आहे.
दरम्यान कारवा येथील खेमाजी नाईक आश्रमशाळेतील विद्यार्थी मृत्यू प्रकरणानंतर समाज कल्याण विभागाने गंभीर दखल घेतली असून चौकशीला सुरुवात केली आहे. प्राथमिक चौकशीत डायरीया हे मृत्यूचे कारण असल्याचे समोर आले असले तरी मृत विद्यार्थ्यांचा विसेरा व पाण्याचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले असल्याची माहिती समाज कल्याण निरीक्षक लक्ष्मीकांत पाटील यांनी लोकसत्ताशी बोलताना दिली. तसेच समाज कल्याण विभागाच्या एका पथकाने कारवा शाळेची संपूर्ण पाहणी केली. जिल्हय़ाचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जिल्हय़ातील सर्व ५५ आश्रमशाळांमधील पिण्याच्या पाण्याचे नमूने तपासण्याचे निर्देश दिले आहेत. कोणत्याही आश्रमशाळेत अशुद्ध पाणी किंवा अव्यवस्था दिसत असेल तर संस्थाध्यक्षावर थेट कारवाई करावी असेही त्यांनी म्हटले आहे.

मराठीतील सर्व नागपूर वृत्तान्त ( Nagpurvidharbh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Nagpur vidarbh news