समोर श्रोते कमी असले तर कुरूक्षेत्रावरील कृष्ण व अर्जुन या जोडगोळीचा दाखला देत अनेक भाषणवीर बाजी मारून नेतात, पण वर्गात एकच प्राध्यापक एकाच विद्यार्थ्यांला शिकवत असल्याचे चित्र अप्रिय वाटते. मानव्येशास्त्राच्या इमारतीत त्यातून शिक्षणाच्या दुरावस्थेचाच विचार मनात येतो. विद्यापीठाच्या अनेक विभागांमध्ये प्राध्यापकांची संख्या जास्त पण, विद्यार्थीच नसल्याने स्वत:च्या कक्षात काम करीत असलेले किंवा कक्षाला कुलूप लावून बाहेर पडलेले प्राध्यापक  चहा किंवा पानटपरीवर उभे दिसतात. शालेय शिक्षणात शिक्षक अतिरिक्त ठरतात तसे उच्चशिक्षणात प्राध्यापक अतिरिक्त का नाही ठरत, असा प्रश्न निर्माण होतो.
आश्चर्य म्हणजे, गेल्या तीन वर्षांच्या तुलनेत यावर्षी विद्यार्थ्यांनी विद्यापीठ कँपस आणि मानव्येशास्त्रांच्या इमारतीतील विभागांमध्ये प्रवेश घेणाऱ्यांची संख्या वाढली असली तरी उत्तरोत्तर वर्गातील उपस्थिती रोडावत जाते. त्यापैकी किती विद्यार्थी परीक्षेला बसतील, असाही प्रश्न विभाग प्रमुखांना सतावत असतो. यासंदर्भात परकीय भाषा विभागाचे प्रमुख डॉ. पुरुषोत्तम निमसरकार म्हणाले, इंग्रजीबरोबर रशियन, फ्रेंच, जर्मन या भाषांना काही वर्षांपूर्वी सुगीचे दिवस होते. एकूण हजार ते अकराशे विद्यार्थी असायचे. हेतूपूर्वक अभ्यासक्रम पूर्ण करण्यावर विद्यार्थ्यांचा भर असायचा. मात्र, हल्ली चारही परकीय भाषा मिळून जेमतेम १००च्या आसपास विद्यार्थी आहेत. विद्यार्थी तळमळीने अभ्यास करीत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. मानव्येशास्त्र इमारतीतील एका विभागाचे प्रमुख नाव न छापण्याच्या अटीवर म्हणाले, पदव्युत्तर शिक्षण घेऊनही विद्यार्थ्यांना अधिव्याख्याता होण्यासाठी ३० लाख रुपये मोजावे लागत असतील तर विद्यार्थी कशाला प्रवेश घेतील? त्यांनाही त्यांच्या भवितव्याचा प्रश्न पडतोच! प्रवेश घेताना काही विद्यार्थी विचारतात, वर्ग नाही केले तर चालेल का? ज्या महाविद्यालयातून पदवी घेऊन विद्यार्थी विद्यापीठात येतात त्या महाविद्यालयातही निम्न दर्जाचे शिक्षण दिले जात असल्याने मानव्येशास्त्रांना भविष्यात उतरती कळा लागेल, असे भाकितच त्यांनी केले.

विद्यापीठ परिसरात तुकडोजी महाराज अध्यासनांतर्गत एम.ए. सुरू केले. मात्र, दोन वर्षांपासून त्या ठिकाणी एकही प्रवेश झालेला नाही. विद्यापीठाच्या तत्त्वज्ञान विभागात एक प्राध्यापक व एक विद्यार्थी, असे चित्र दोन वर्षांपूर्वी होते. त्यात यावर्षी १७ प्रवेश होऊन बोटावर मोजण्याइतपत विद्यार्थ्यांनी वर्गात शिक्षण घेतले, हे विशेष. विद्यार्थी कमी आणि प्राध्यापकच जास्त, अशी स्थिती बऱ्याच विभागांमध्ये असून प्राध्यापक शिकवायला तयार असतानाही विद्यार्थीच नसतात, त्यामुळे भविष्यात मानव्येशास्त्र विभागाची आणखी वाताहत होण्याची भीती तेथील प्राध्यापकांनी व्यक्त केली आहे. मात्र, त्याच वेळी काही प्राध्यापक विद्यापीठाच्या सेवेत फारच सुखी आहेत. कारण, शिक्षकांप्रमाणे त्यांना दरवर्षी विद्यार्थी गोळा करावे लागत नाहीत. विद्यार्थी नसले तरी पीएच.डी. एम.फील.चे विद्यार्थी आहेत, असे सांगून वेळ मारून नेतात. २० बाय २० च्या खोल्यांमध्ये काहींमध्ये ४०, तर काहींमध्ये ६० ची बैठक व्यवस्था असताना पुढच्या बाकांच्या रांगेत पूर्ण विद्यार्थी नसतात. असलेच तर हातावरच्या बोटावर मोजण्याइतपत मुले असतात, अशी परिस्थिती आहे. आता परीक्षेच्या काळात विद्यार्थी कमी संख्येने दिसतात. मात्र, ज्या ठिकाणी विद्यार्थ्यांअभावी प्राध्यापकांना शिकवण्याची गरजच पडत नाही, अशा विभागातील प्राध्यापकांना अतिरिक्त ठरवून त्यांची इतर ठिकाणी गच्छंती करण्याचा नियम आज तरी विद्यापीठात अस्तित्वात नाही, हेच खरे.