नागपूर शहर संत्रानगरी म्हणून ओळखली जात असताना संत्र्यासाठी शेतकऱ्यांना आंदोलन करावे लागत आहे. गारपिटीमुळे मोठय़ा प्रमाणात संत्र्याचे नुकसान झाले असताना कोकण आणि मराठवाडय़ाप्रमाणे विदर्भातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना ५० हजार हेक्टरी प्रमाणे राज्य शासनाने मदत करावी, अशी मागणी करीत माजी आमदार सुनील शिंदे यांनी विधानभवन परिसरात आंदोलन करून प्रसार माध्यमासह आणि लोकप्रतिनिधींना संत्र्यांचे वाटप केले. एकीकडे संत्र्यांचे वाटप होत असताना दुसरीकडे मात्र तो मिळविण्यासाठीची झुंबड बघता अनेकांना संत्र्यासाठी कसरत करावी लागल्याने खऱ्या अर्थाने संत्रा गाजला.
दोन वर्षांंपासून काटोल, नरखेड, मोर्शी आणि वरुड तालुक्यात गारपिटीमुळे तर गेल्यावर्षी मृग बहार न आल्याने संत्रा उत्पादकांचे नुकसान झाले. नागपूरची संत्रानगरी म्हणून ओळख असली तरी शहर आणि जिल्ह्य़ात संत्रा उत्पादकांचे होत असलेले नुकसान आणि त्यामुळे होत असलेल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या बघता ही संत्रानगरी म्हणावी का असा प्रश्न माजी आमदार सुनील शिंदे प्रत्येक हिवाळी अधिवेशनात उपस्थित करून विधानभवन परिसरात आंदोलन करीत असतात. राज्य सरकारने ७ हजार कोटीचे पॅकेज जाहीर केल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे शिंदे यांनी कौतुक केल्यानंतर त्यांनी संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना कोकण आणि मराठवाडय़ाप्रमाणे ५० हजार हेक्टरप्रमाणे मदत करावी, अशी मागणी केली. ५० पैशाच्यावर असलेली पैसेवारी तात्काळ कमी केल्याचे जाहीर करून विदर्भातील सर्व शेतकऱ्यांना एकसारखी मदत करा, पीक व संत्रा विम्याचे नियम चुकीच्या पद्धतीने असल्यामुळे यातील दोष दूर करण्यात यावा, गेल्या काही दिवसात दोन ते तीन तास भारनियमन केले जात आहे ते बंद करून सकाळी ६ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत भारनियमन बंद केले पाहिजे. अशा विविध मागण्या यावेळी करण्यात आल्या. फलोत्पादनाच्या कार्यक्रमासोबत ड्रिपचे युनिट द्यावे आणि त्यावर ९० टक्के सबसिडी जाहीर करावी, जेणे कमी पाण्यात संत्राचे झाडे वाळणार नाही. कापसाचा हमी भाव सहा हजार रुपये पर्यंत वाढवून दिल्याशिवाय उत्पादन खर्चाला ते परवडत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्पादनाच्या खर्चाच्या ५० टक्के नफा शेतकऱ्यांना मिळावयास पाहिजे. शिवाय त्याची अंमलबजावणी व्हावी, पैसेवारी, संत्रा कारखाना व संत्रासाठी मदत देण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी बैठक बोलवावी, अशी मागणी शिंदे यांनी केली. यावेळी भाजप आमदार सुधाकरराव देशमुख उपस्थित होते.
माजी आमदार सुनील शिंदे विधानभवन परिसरात संत्र्याच्या पाच, सहा पेटय़ा घेऊन आल्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला आणि त्यानंतर ते उपस्थित आमदार आणि प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी आणि अन्य लोकांना त्याचे वाटप करीत होते. त्याचा फायदा घेत काही लोक दोन ते तीन संत्री घेऊन जात होते. ज्यांना मिळाले नाही ते जबरदस्तीने वाटप करणाऱ्यांकडून मिळवित होते.