राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे फोडाफोडीचं राजकारण करत आहेत. महाराष्ट्रातील निवडणूक तोंडावर आलेली असताना हे प्रकार केले जात असल्याचा आरोप केल्यानंतर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील शरद पवारांना आत्मचिंतन करण्याची गरज असल्याचे म्हटले आहे. शिवाय, आमदार फोडण्यासाठी सत्तेचा वापर केला गेलेला नाही, चांगल्या लोकांनाच पक्षात प्रवेश दिला जात असल्याचेही सांगितले आहे.

शरद पवार यांनी  केलेल्या आरोपानंतर नागपूरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यावर प्रतिक्रिया देताना सांगितले की, काँग्रेस व राष्ट्रवादीचे अनेक नेते भाजपात प्रवेश करण्यास इच्छुक आहेत. मात्र, आम्ही सर्वांनाच पक्षात प्रवेश देणार नाही, काही निवडक चांगल्या जणांचा प्रवेश दिला जाईल. ईडी किंवा कोणत्याही एजन्सीद्वारे सुरू असलेल्या चौकशीत सहभाग असलेल्यांना सहभागी करून घेतले जाणार नाही. आम्हाला कोणालाही आमंत्रित करण्याची किंवा पक्ष प्रवेशासाठी कुणाच्या मागे लागण्याची आवश्यकता नाही. भाजपाची ताकद आता वाढलेली आहे. त्यामुळे लोक स्वतः भाजपात प्रवेश करत आहेत. यातील जे चांगले आहेत, लोकाभिमुख कामे करतात त्यातल्या निवडक लोकांना आम्ही घेऊ, इतरांना दुसऱ्या पक्षात जायचं ते जातील.

तसेच, भाजपाला दबावाचे राजकारण करण्याचीही आवश्यकता नाही. उलट भाजपाने मागिल पाच वर्षांच्या सरकारच्या कार्यकाळात अनेक साखर कारखान्यांना त्यांच्या कठीण परिस्थितीत मदत केलेली आहे. यामध्ये काँग्रेस – राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या कारखान्यांची मोठी यादी आहे, मात्र आम्ही त्याबदल्यात कोणालाच भाजपात प्रवेश करण्यास सांगितले नाही. म्हणून शरद पवारांनी आमच्यावर आरोप करण्यापेक्षा आपल्या पक्षातील नेते पक्षाला का सोडचिठ्ठी देत आहेत, याबाबत आत्मचिंतन करावे, असा सल्ला देखील मुख्यमंत्र्यांनी दिला.