निवडणूक आखाडा : मध्य नागपुरातील निवडणूक चर्चा मुद्यावरून गुद्यावर

खुर्च्याची फेकाफेक करत धक्काबुक्की

निवडणूक म्हटलं की काय घडेल ते सांगता येत नाही. कधी गळ्यात गळे तर कधी दोन हात. असाच प्रकार नागपूरमध्ये घटला. मध्य नागपूर मतदारसंघात रविवारी राजकीय चर्चा आयोजित करण्यात आली होती. मात्र, मुद्यांवरील चर्चा गुद्यांवर संपली. भाजपाचे नगरसेवक दयाशंकर तिवारी यांच्या कार्यकर्त्यांनी खुर्च्याची फेकाफेक करत धक्काबुक्की केल्याने चुनावी आखाड्याचा हा कार्यक्रम चांगलाच गाजला.

‘वार्ड समस्या निवारण समिती’तर्फे जलालखेडा भागात रविवारी ‘चुनावी अखाडा’ कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी मध्य नागपूरमधील सर्वपक्षीय उमेदवारांना निमंत्रण देण्यात आले होते. भाजपकडून उमेदवाराऐवजी तिवारी हजर होते. काँग्रेसचे उमेदवार बंटी शेळके यांना सर्वप्रथम प्रश्न विचारण्यात आले. त्यांनी उत्तर दिले आणि प्रचारासाठी जातो म्हणून निघून गेले. त्यावर नगरसेवक तिवारी यांनी आमचेही ऐकून घ्या, असे सांगितले. पण शेळके थांबले नाही. त्यामुळे तिवारी यांच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घालत खुर्च्यांची फेकाफेक केली.

वंचित आघाडीचे कमलेश भागवतकर, रमेश पुणेकर मंचावर उपस्थित होते. पहिला प्रश्न बंटी शेळके यांना विचारण्यात आला. शेळके हे ‘चमको आंदोलन’करतात, असा आरोप करण्यात आला. त्यावर असे आंदोलन मी करतो का, असा प्रतिप्रश्न बसलेल्या उमेदवारांना केला. त्यानंतर त्यांना बडकस चौकात संघाचा गणवेश जाळल्याबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी सरसंघचालक यांनी पती-पत्नीचे संबंध हे कॉन्ट्रॅक्ट असते, असे वक्तव्य केले होते. त्याच्या निषेधार्थ हे आंदोलन केले होते, असा दावा त्यांनी केला. त्यानंतर मेयो आणि डागा रुग्णालयासंदर्भात प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी ‘ब्लड ऑन कॉल’ही योजना भाजपाने गुंडाळली. हेडगेवार रक्तपेढी रक्तदानाच्या माध्यमातून रक्त गोळा करते. परंतु ते स्वस्त दरात लोकांना देत नाही, असा आरोप शेळकेंनी केला. यानंतर मेयो रुग्णालयाची इमारत ३०० कोटी रुपये खर्च करून बांधली. पण तेथे व्हेटिंलेटर मिळत नाही, अशी टीका केली. या टीकेला उत्तर देण्यासाठी दयाशंकर तिवारी उठले. परंतु शेळके प्रचारासाठी जायचे असल्याचे सांगून तेथून निघाले. त्यावर तिवारी यांनी उत्तर ऐकून घ्या, असे आव्हान दिले. परंतु शेळके थांबले नाही. त्यानंतर तिवारी यांच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला आणि कार्यक्रम उधळून लावला.

बंटी शेळकेच्या भाषणावर माझी बाजू मांडावयाची होती, पण ते निघून गेले. त्याच्यामुळे मी संतापलो. त्यानंतर माझे कार्यकर्ते आरोडाओरडा करू लागले. कुणीतरी या सर्व बाबींची चित्रफिती तयार करीत होते. ते थांबवण्याची विनंती केली. त्यावरून गोंधळ झाला आणि खुर्च्यांची फेकाफेक झाली, असा दावाही नगरसेवक दयाशंकर तिवारी यांनी केला, तर बंटी शेळके यांनी गोंधळाशी आपला काही संबंध नाही, असे सांगितलं.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व नागपूर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Party activists fight in election programme in nagpur bmh