यवतमाळ विधानसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवार नंदिनी नीलेश पारवेकर यांच्या प्रचाराची सुरुवात जवळच्याच लोहारा येथील हेमांडपंथी मंदिरातील केदारेश्वर या शंकराच्या मंदिरात नंदिनी यांनी नारळ फोडून करण्यात आली. शनिवारी सकाळी ८.३० वाजता जिल्हा काँग्रेस समितीचे अध्यक्ष आमदार माणिकराव ठाकरे, सामाजिक न्यायमंत्री शिवाजीराव मोघे, विधानसभेचे उपाध्यक्ष प्रा. वसंत पुरके, जिल्हा काँग्रेस अध्यक्ष आमदार वामनराव कासावार यांनीही नारळ फोडून प्रचाराचा श्रीगणेशा केला. नीलेश पारवेकरांचे मतदार संघाच्या विकासाचे अपूर्ण राहिलेले स्वप्न पूर्ण करण्यासाठी मतदारांनी आपल्याला निवडून द्यावे, असे आवाहन नंदिनी पारवेकर यांनी केले आहे.
‘दिवं. नीलेश पारवेकर अमर रहे’ च्या घोषणांनी लोहारा येथील केदारेश्वर मंदिराचा परिसर दणाणून गेला होता. यावेळी सरचिटणीस अशोक बोबडे, कोषाध्यक्ष राजू निलावार, माजी नगराध्यक्ष बाळासाहेब चौधरी, जाफर गिलानी, अखिल भारतीय काँग्रेस समितीच्या सचिव संध्या सव्वालाखे, जलालुद्दीन गिलानी, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल ठाकरे, काँग्रेसचे जिल्हा परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रताप राठोड, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष बाळासाहेब इंगोले, माजी खासदार सदाशिवराव ठाकरे यांच्यासह हजारच्या आसपास कार्यकत्रे व नेते यावेळी हजर होते. प्रचाराचा नारळ फोडल्यानंतर कार्यकर्त्यांची भव्य मिरवणूक लोहारा गावातून निघाली तेव्हा ‘वारे पंजा आया पंजा’च्या घोषणा देत कार्यकत्रे व नेते यांनी मतांचा जोगवा मागणे सुरू केले आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख १८ मे रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत होती. पण, त्यापूर्वीच म्हणजे शनिवारी सकाळी ८.३० वाजता काँग्रेसने प्रचाराचा बिगुल वाजवला.
मे महिन्यातील आग ओकणाऱ्या सूर्याला साक्षी ठेवून भरदुपारी खेडय़ापाडय़ात जाऊन प्रचार कसा करावा, हा काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षासमोर प्रश्न असला तरी निवडणुकीत या गोष्टींची पर्वा न करता प्रचाराचे कर्तव्य कार्यकर्त्यांनी व नेत्यांनी पार पाडलेच पाहिजे, असे आवाहन दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी केले आहे. नंदिनी पारवेकर यांना सासर आणि माहेरचा राजकीय वारसा असला तरी निवडणुकीच्या आखाडय़ात त्या पहिल्यांदाच उतरल्या आहेत. निवडणूक लढवण्याचा त्यांना अनुभव नसला तरी काँग्रेस कार्यकर्त्यांनी खंबीरपणे त्यांच्या पाठीशी उभे राहण्याचा निर्धार केला आहे. भाजपाचे उमेदवार मदन येरावार हे राजकारणात दीर्घानुभवी आहेत. त्यांनी यवतमाळ विधानसभेची निवडणूक दोनदा जिंकली आहे आणि दोनदा पराभूत होण्याचा अनुभवही घेतला आहे. २००९च्या निवडणुकीत काँग्रेस उमेदवार नीलेश पारवेकर यांच्याकडून ते पराभूत झाले होते. उल्लेखनीय म्हणजे, २ जूनला होणाऱ्या पोटनिवडणुकीत विजयी होणाऱ्या उमेदवाराला सव्वा वर्षांपेक्षा अधिक कार्यकाल मिळणार नाही. मात्र, काँग्रेस आणि भाजपाने मिशन-२०१४ हे लक्ष्य ठेवल्यामुळे या पोटनिवडणुकीलाही असाधारण महत्त्व आले असून दोन्ही पक्षांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. नंदिनी पारवेकर यांना सहानुभूती लाटेचा फायदा होईल, अशी खात्री काँग्रेसला  आहे.