नळदुर्गच्या ऐतिहासिक किल्ल्यातील प्रेक्षणीय व नयनरम्य नर-मादी धबधबा तब्बल ४ वर्षांनी शनिवारी सकाळी अवतीर्ण झाला. धबधब्याचे सौंदर्य न्याहाळण्यास पर्यटकांची आता गर्दी वाढण्याची शक्यता आहे. ‘नर-मादी’सह किल्ल्यातील अन्य धबधबेही जिवंत झाले आहेत.
नळदुर्ग किल्ल्यातील नर-मादी व शिलक धबधबे जुन्या काळापासून प्रसिद्ध आहेत. हे धबधबे अवतीर्ण झाल्यानंतर दरवर्षी पर्यटक मोठय़ा संख्येने नळदुर्ग नगरीत दाखल होतात. मात्र, मागील ४ वर्षांपासून निसर्गाच्या अवकृपेमुळे पाऊस अतिशय कमी झाला. परिणामी या नयनरम्य धबधब्यांचे दृश्य पर्यटकांना पारखे झाले. पर्यटक किल्ला पाहण्यास येत. मात्र, किल्ल्यातील नर-मादी व अन्य धबधबे मृतप्राय झाल्याने पर्यटक निराश होऊनच परतत.
यंदाही पावसाळ्यातील पहिले ३ महिने अशीच स्थिती होती. परंतु गणरायाच्या आगमनापासून पावसाने पुनरागमन केले. मागील सलग १० दिवस गणेशोत्सव काळात झालेल्या दमदार पावसाने केवळ १० दिवसांतच बोरी धरण पूर्ण क्षमतेने भरले. दहा दिवसांपूर्वी याच धरणात केवळ २६ टक्के पाणीसाठा होता. मात्र, दमदार पावसामुळे हे धरण आता १०० टक्के भरले. बोरी धरण तुडूंब भरून धरणाचा सांडवा सुरू झाला. सकाळी ११ वाजता नर-मादीसह शिलक धबधबाही ओसंडून वाहू लागला. बोरी धरणाच्या सांडव्याचे पाणी थेट बोरी नदीत जाते. या पाण्यावरच हे धबधबे अवतीर्ण होतात.
नर-मादी धबधबा पाहायला तुम्ही गेलात आणि पाऊस आल्यास ती एक वेगळीच अनुभूती ठरेल.
‘अजदीन इ चष्म
महिब्बान रोशन
मीगदर्द चष्म दुश्मनाच
गर्दद क्रूर’
– किल्ल्याच्या पाणी महालातील एका पारसी लेखातील हे शब्द आहेत. ज्याकडे पाहिल्यानंतर मित्रांचे डोळे प्रसन्नतेने उजळतील. शत्रूंच्या डोळ्यांपुढे अंधारी येईल, अशी धन्यता या महालाची आहे असा या ओळींचा अर्थ होतो. उत्तरेच्या बाजूने बोरी नदी किल्ल्यात वाहात येऊन तिला चंद्रकोरीचा आकार देऊन पुन्हा उत्तरेकडे वळविली आहे. पूर्व-पश्चिम असा हा बंधारा अतिशय कल्पकतेने, भक्कम तऱ्हेने बांधला आहे. बंधाऱ्याच्या वरच्या बाजूला नदीच्या पुराचे पाणी वाहून जावे म्हणून दोन भले मोठे सांडवे तयार केले आहेत. या दोन सांडव्यांना नर व मादी अशी नावे दिली आहेत. यालाच नर-मादी धबधबा म्हणतात. पावसाळ्यात नदीला पाणी आले की नर-मादी धबधब्यातील पाणी पुढे १०० फूट खाली खोल फेसाळत जाऊन आदळते.
पर्यटकांना आवर घालणे गरजेचे
नर-मादी धबधबा सुरू झाल्याने पर्यटक मोठय़ा संख्येने किल्ल्यास भेट देण्यास येतील. मात्र, या पर्यटकांच्या अतिउत्साहाला आवर घालण्याची गरज आहे. किल्ल्यात पुरातत्त्व विभागाचा एकच कर्मचारी आहे. या कर्मचाऱ्याला पर्यटकांना आवरणे अवघड होणार आहे. काही तरुण महिला-मुलींना छेडण्याचा प्रयत्न करतात. शिवाय पाणी महालावरून खाली धबधब्याजवळही पाण्यात उडय़ा मारण्याचा काही पर्यटक प्रयत्न करतात. त्यामुळे अनेकांना हकनाक जीव गमवावा लागला आहे. अशा प्रवृत्तींना पायबंद घालण्यासाठी महालावर पोलीस बंदोबस्त तनात करण्याची गरज आहे.