नार-पार खोऱ्यातील पाणी गुजरातला पळवून नेले जाणार असल्याचा अपप्रचार विरोधक करत आहेत. परंतु, काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि
माजी केंद्रीयमंत्री पवनकुमार बन्सल यांनी चार
वर्षांपूर्वी पाणीवाटपाच्या त्या करारावर स्वाक्षरी केली होती. आज पाणी पळविले जाणार असल्याची ओरड करणारे नाशिकचे पालकमंत्री त्यावेळी तेलगीकडून मिळालेले पैसे मोजत होते काय, असा प्रश्न उपस्थित करत भाजपचे नेते गोपीनाथ मुंडे यांनी काँग्रेस आघाडीवर हल्ला चढविला.
दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार हरिश्चंद्र चव्हाण यांच्या प्रचारार्थ सोमवारी दिंडोरी येथील बाजार समिती आवारात झालेल्या जाहीर सभेत ते बोलत होते. नार-पार खोऱ्यातील पाणी अरबी समुद्रात वाहून जाते. हे पाणी अडविण्यासाठी महाराष्ट्र आणि गुजरात शासन यांच्यात पाणीवाटप करार झाला आहे. काँग्रेस आघाडी प्रचारात गुजरात शासन महाराष्ट्रातील पाणी पळवून नेणार असल्याचे टीकास्त्र सोडत आहे. विरोधकांकडून केल्या जाणाऱ्या आरोपांचा मुंडे यांनी कठोर शब्दात समाचार घेतला. काँग्रेस आघाडीकडून या मुद्याचा अपप्रचार केला जात आहे. जेव्हा उभय राज्यांमध्ये पाणीवाटपासंबंधी करार झाला, तेव्हा राज्यात काँग्रेसचे मुख्यमंत्री होते, याकडे त्यांनी लक्ष वेधले. त्यावेळी मूग गिळून बसलेली ही मंडळी आज पाणी पळविले जाणार असल्याची आवई उठवत असल्याचे मुंडे यांनी सांगितले. या मुद्यावरून त्यांनी भुजबळांचे नाव न घेता शरसंधान साधले. नार-पार खोऱ्यातील पाण्याचा उपयोग नाशिक, जळगाव व मराठवाडय़ातील अनेक भागास होणार आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या हक्काचे पाणी गुजरातला दिले जाणार नसल्याचे मुंडे यांनी सांगितले. शरद पवार यांच्यावरही टीकास्त्र सोडत त्यांनी लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसची दारुण अवस्था होणार असल्याचे सांगितले.
दहा वर्षांपासून खासदार असणाऱ्या हरिश्चंद्र चव्हाण यांना मोदी सरकारमध्ये मंत्रीपद दिले जाणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. महायुती सत्तेत आल्यास शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची मुदत एक वर्षांपर्यंत वाढविली जाईल. ग्रामीण भागातील भारनियमनाचा प्रश्न निकाली काढला जाईल. राज्यात टोल व वाळूमाफिया राहणार नाहीत, असे आश्वासन मुंडे यांनी दिले.