पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रचार सभा उद्या, मंगळवारी नागपुरात होणार असून त्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जय्यत तयारी केली आहे. सुमारे एक लाख लोक सभेत राहतील, असा अंदाज व्यक्त करण्यात आला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रचार सभा गोंदियात झाली. विदर्भातील खामगाव, धामणगाव येथील सभांची तारीख जाहीर झालेली नाही. ब्रह्मपुरीत शुक्रवारी १० ऑक्टोबरला प्रचार सभा होणार आहे. उद्या, मंगळवारी दुपारी चार वाजता कस्तुरचंद पार्कममध्ये नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा होईल. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी, प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस, खा. रामदास आठवले, खा. अजय संचेती, बनवारीलाल पुरोहित यांची सभेत भाषणे होतील. सुधाकर कोहळे, कृष्णा खोपडे, सुधाकर देशमुख, विकास कुंभारे, डॉ. मिलिंद माने, चंद्रशेखर बावनकुळे, समीर मेघे, आशिष देशमुख, सुधीर पारवे, मलिक्कार्जुन रेड्डी हे उमेदवार या सभेत प्रामुख्याने उपस्थित राहतील.
नागपूरच्या सभेची व्यवस्था गिरीश व्यास, आमदार अनिल सोले, राजेश बागडी, प्रा. संजय भेंडे, बळवंत जिचकार, दयाशंकर तिवारी, संदीप जोशी, डॉ. राजीव पोतदार, अरविंद गजभिये, प्रेम झाडे यांच्याकडे राहील. बैठक व्यवस्था बंटी कुकडे, सुधीर सावरकर, जितेंद्र ठाकूर, सतीश वडे, डॉ. कीर्तिदा अजमेरा, वंदना यंगटवार, माया हाडे, ज्योती जनबंधू, मनीषा कोठे यांच्यावर सोपविण्यात आली आहे. रिझव्‍‌र्ह बँकेसमोरील प्रवेश द्वारातून केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी व व्हीव्हीआयपींना प्रवेश राहील. पेट्रोल पंप व लष्करी कार्यालयासमोर व्हीआयपी व पत्रकार कक्ष राहील. कामठी मार्गावरील वीज कंपनीच्या कार्यालयासमोरील दारातून इतर व्हीआयपींना प्रवेश राहील. इतर कार्यकर्त्यांना पूर्व व उत्तर दारांतून प्रवेश राहील, अशी माहिती पक्षाचे प्रवक्ते गिरीश व्यास यांनी सोमवारी सकाळी पत्रकार परिषदेत दिली.
सभेची तयारी की प्रचार? कार्यकर्ते विवंचनेत
कस्तुरचंद पार्कवर प्रचारसभा होत असून या सभेची तयारी करावी की प्रचार, या विवंचनेत जिल्ह्य़ातील कार्यकर्ते पडले असल्याचे चित्र आहे. यंदा विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या एकाही स्टार प्रचारकाची जाहीर सभा शहरात झालेली नाही.
मोदींच्या सभेने हा जाहीर सभांचा झंझावात सुरू होत आहे. सध्या निवडणुकीचा प्रचार सुरू असून त्यासाठी आता केवळ सात दिवसच शिल्लक आहेत. त्यामुळे उमेदवार व त्यांचे कार्यकर्ते प्रचारास भिडले आहेत. त्यातच मोदींची सभा असल्याने त्या सभेच्या तयारीला पदाधिकारी व कार्यकर्ते लागले आहेत. दक्षिण नागपूर विधानसभा मतदारसंघातही सकाळी प्रचार झाला. त्यानंतर लगेचच दुपारी बारा वाजता कार्यकर्त्यांची बैठक होती. सुमारे दोन तास ही बैठक झाली. विश्रांतीला वेळच मिळाला नाही.
 पुन्हा सायंकाळी प्रचार व रात्री बैठक. त्यातच उद्या मोदींची सभा असल्याने सभेची तयारी करावी की प्रचार, या विवंचनेत कार्यकर्ते पडले असल्याचे दिसून आले. केवळ दक्षिण नागपूरच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्य़ातील भाजप कार्यकर्तेही या विवंचनेत पडले असल्याचे चित्र आहे. प्रचार व सभेची तयारी यात दमछाक होणार असली तरी सभेला लाखो कार्यकर्ते हजर राहतीलच, असा आत्मविश्वास एका कार्यकर्त्यांने व्यक्त केला.