विदर्भामध्ये कुठेही मोदींची लाट नसून भाजपकडून अपप्रचार केला जात आहे. विदर्भात काँग्रेसला चांगले यश मिळेल, असा विश्वास रोहयोमंत्री नितीन राऊत यांनी व्यक्त केला.ही लोकसभा निवडणूक एकाधिकारशाही विरोधात लोकशाही अशी आहे. विदर्भातील विविध जिल्ह्य़ात दौरा केला असता कुठेही मोदींची लाट दिसून येत नाही. गेल्या दहा वर्षांत काँग्रेस सरकारने आणलेल्या विविध योजनांचा फायदा सामान्य माणसाला झाला आहे. सध्या काँग्रेसला अनुकूल असे वातावरण असून विदर्भात जास्तीत जास्त जागा मिळतील, असा विश्वास आहे. भारतीय जनता पक्षाने जाहीर केलेल्या जाहीरनाम्याच्या मुख्य पृष्ठावर पक्षाच्या सर्व नेत्यांचे छायाचित्र आहे मात्र गडकरी यांचे छायाचित्र नाही. त्यामुळे त्यांचे केंद्रात काय स्थान हे दिसून येते. जाहीर नाम्यात मदरशांच्या आधुनिकरणचा मुद्दा आहे. राज्य सरकारने यापूर्वी मदरशांच्या आधुनिकीरणावर स्वतंत्र निधीची तरतूद केली आहे. ज्यावेळी सभागृहात हा विषय आला होता, त्यावेळी भाजप आणि शिवसेनेच्या नेत्यांनी विरोध केला होता. आता त्यांनी केवळ मतांसाठी मदरशांचे आधुनिकीकरणाचा मुद्दा जाहीरनाम्यात आणला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी या संदर्भात खुलासा केला पाहिजे, असेही राऊत म्हणाले. विलास मुत्तेमवार यांच्यासोबत माझे कधीच मतभेद नव्हते. काँग्रेस पक्षाचा नेता आणि मंत्री म्हणून प्रचार करीत आहे. मुत्तेमवार यांनी काही नवीन प्रकल्प आणले आहेत, असेही राऊत म्हणाले.