तालुकास्तरीय ३८ वे विज्ञान प्रदर्शन पंचवटीतील सीडीओ मेरी हायस्कूल येथे तीन ते पाच जानेवारी या कालावधीत होणार असून प्रदर्शनाच्या नियोजनाबाबतची सहविचार सभा गटशिक्षणाधिकारी एम. के. भोये यांच्या अध्यक्षतेखाली झाली.
या प्रदर्शनाच्या नियोजनासंदर्भात या सभेत चर्चा करण्यात आली. विज्ञान प्रमुख तथा विस्तार अधिकारी व्ही. डी. चव्हाण यांनी  मार्गदर्शन केले. यंदाच्या विज्ञान प्रदर्शनाचा विषय विज्ञान व समाज असून उद्योग, नैसगिक संसाधने आणि त्यांचे संवर्धन, वाहतूक व दळणवळण, माहिती व शैक्षणिक तंत्रज्ञान, सामूदायिक आरोग्य आणि पर्यावरण, गणितीय प्रतिकृती असे सहा विषय आहेत. विज्ञान प्रदर्शनात इयत्ता पहिली ते आठवी पर्यंतचे शिक्षक सहभागी होणार आहेत. यंदापासून पाचवी ते आठवी आणि नववी ते बारावी अशा दोन गटात विद्यार्थ्यांच्या प्रदर्शनीय वस्तूंची मांडणी करता येणार आहे. प्रयोगशाळा सहाय्यक, परिचर यांनी केलेल्या विज्ञान व गणित विषयाचे अध्यापन शैक्षणिक साहित्याचे तसेच लोकसंख्या शिक्षण विषयक प्रदर्शनीय प्रकल्प व प्रतिकृतीचे प्राथमिक व माध्यमिक विभागासाठी स्वतंत्र दालन राहणार आहे.
तालुका विज्ञान अध्यापक संघाचे अध्यक्ष एन. एन. खैरनार, जिल्हा विज्ञान अध्यापक संघाचे कार्यवाह डी. यु. अहिरे, शाळेतील ज्येष्ठ शिक्षक दिलीप अहिरे, अनिल पवार, वसुंधरा अकोलकर-भुसारे आदींनी मार्गदर्शन सूचना केल्या. विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सी. एम. कुलकर्णी यांनी स्वागत केले. आनंदा वाणी यांनी आभार मानले. तालुक्यातील सर्व केंद्रातील प्राथमिक व माध्यमिक तसेच उच्च माध्यमिक शाळांनी एक व दोन जानेवारी रोजी सीडीओ मेरी हायस्कूल येथे सकाळी १० ते पाच या वेळेत्शाळेतील विज्ञान प्रमुख अनिल पवार यांच्याशी संपर्क करून नोंदणी करणे आवश्यक असल्याचे चव्हाण यांनी सांगितले.