– ‘सी प्लेन’ची सेवा ओझर विमानतळावरून
-सिंहस्थात अवकाशातून नाशिक-त्र्यंबकेश्वर दर्शनाची संधी

प्रदीर्घ काळापासून रखडलेल्या नाशिकला हवाई नकाशावर आणण्याचा विषय आता बहुचर्चित ‘सी प्लेन’ अर्थात जमीन व पाण्यावर उतरू शकणाऱ्या नऊ आसनी छोटेखानी विमानाच्या माध्यमातून सोडविण्यात आला आहे. १५ जूनपासून नाशिक-पुणे या औद्योगिक शहरांदरम्यान या विमानाची नियमित सेवा सुरू होत आहे. सध्या रस्तेमार्गे अतिशय कंटाळवाणा वाटणारा सहा तासांचा हा प्रवास हवाईमार्गे अवघ्या तासाभरावर येईल. तथापि, त्यासाठी मोजावे लागतील प्रति व्यक्ती ५९९९ रुपये. गंगापूर धरणावरून ही सेवा प्रस्तावित आहे. तथापि, पर्यावरणवादी व पक्षीमित्र संघटनांच्या आक्षेपामुळे तूर्तास ओझरच्या विमानतळावरून ती सुरू होत आहे. पुढील काळात गंगापूर धरणावरून सी प्लेनची ‘जॉय राइड’ सुरू करण्याचा विचार आहे. विमानात बसण्याची इच्छा असणाऱ्यांना ती या माध्यमातून पूर्ण करता येईल.
महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ आणि मेहेर एअर सव्‍‌र्हिसेस यांच्या माध्यमातून राज्यातील महत्त्वाची शहरे सी प्लेन सेवेने जोडण्याचा विषय मागील दीड ते दोन वर्षांपासून चर्चेत आहे. नाशिक शहरात त्यासाठी गंगापूर धरणाची निवड करण्यात आली होती. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या या धरणात पक्ष्यांचाही अधिवास आहे. या मुद्दय़ावरून पर्यावरणप्रेमींनी या सेवेला कडाडून विरोध दर्शविला. दरम्यानच्या काळात सी प्लेनच्या काही चाचण्या पार पडल्या. त्यास बराच काळ लोटूनही ही सेवा सुरू होत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात होते. ही प्रतीक्षा आता संपुष्टात आली असून पाण्यावर उतरण्याची क्षमता असणारे हे विमान तूर्तास जमिनीवरून म्हणजे ओझर विमानतळावरून उड्डाण घेणार आहे. मेहेर सव्‍‌र्हिसेसचे प्रमुख सिद्धार्थ वर्मा व मान तसेच ट्रॅव्हल असोसिएशन ऑफ नाशिक अर्थात तानचे अध्यक्ष दत्ता भालेराव व पदाधिकारी यांच्यात मंगळवारी बैठक पार पडली. त्यात १५ जूनपासून नाशिक-पुणे हवाई सेवेला सुरुवात करण्याचे जाहीर करण्यात आले. सकाळी व सायंकाळी दोन फेऱ्यांचे नियोजन असून त्यावर ५ जून रोजी आयोजित संयुक्त बैठकीत चर्चा करून सविस्तर वेळापत्रक जाहीर करण्यात येणार आहे. पुणे व नाशिक या औद्योगिक शहरांदरम्यान दररोज प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. नाशिक ते पुणे थेट रेल्वेसेवा नाही. रस्ते मार्गाने २१० किलोमीटरचे अंतर पार करताना सहा तासांचा कालावधी लागतो. वाहतूक कोंडी व तत्सम अडचणी वेगळ्याच. या पाश्र्वभूमीवर, ही विमानसेवा उपयुक्त ठरणार असल्याचा विश्वास संबंधितांनी व्यक्त केला. जमीन व पाण्यावर उतरू शकणाऱ्या या विमानाद्वारे ओझर विमानतळावरून ही सेवा सुरू होईल. पुण्यातील लोहगाव विमानतळावर हे विमान उतरणार असल्याचे वर्मा यांनी नमूद केले. प्रारंभिक स्वरूपात या प्रवासासाठी ५,९९९ रुपये तिकीट राहणार असून पुढील काळात त्यात वाढ होईल. नऊ आसनी विमानाला मिळणारा प्रतिसाद लक्षात घेऊन पुढील काळात १८ आसनी विमान आणण्याची कंपनीची तयारी आहे. सकाळी व सायंकाळी अशा दोन सत्रांत ही विमानसेवा असावी अशी मागणी तानने
केली आहे.
या निमित्ताने १०० कोटी रुपये खर्चून उभारलेल्या ओझरच्या विमानतळाचा वापरही सुरू होईल. उद्घाटनानंतर या विमानतळावरून विमानसेवा कधी सुरू होणार याची सर्वाना प्रतीक्षा होती. परंतु, विमान कंपन्यांनी केलेल्या सर्वेक्षणामुळे नाशिक-मुंबई अथवा नाशिक-पुणे विमानसेवेला फारसा प्रतिसाद मिळणार नसल्याने त्यांनी रुची दाखविली नाही. मेहेर कंपनीची विमाने छोटेखानी असल्याने त्यांना अपेक्षित प्रवासी मिळू शकतील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला. पुढील टप्प्यात नाशिक-मुंबई विमानसेवेचा विचार असल्याचे सांगण्यात आले.

सी प्लेनची ‘जॉय राईड’
जमीन व पाण्यावर उतरण्याची क्षमता असणाऱ्या सी प्लेनबाबत सर्वसामान्यांमध्ये काही गैरसमज आहेत. हे गैरसमज दूर करण्याबरोबर हवाई प्रवासाचा आनंद घेण्यासाठी कंपनीने गंगापूर धरणावर ‘जॉय राइड’ सुरू करण्याचे नियोजन केले आहे. या माध्यमातून शहरवासीयांना सी प्लेनमधून आसपासच्या भागात हवाई प्रवासाची संधी मिळेल. यासाठी दोन ते अडीच हजार रुपयांपर्यंत शुल्क आकारणी करावी, अशी मागणी तानने केली आहे. नाशिक-पुणे विमानसेवा सुरू झाल्यानंतर कालांतराने ही राइड सुरू केली जाणार आहे.

नाशिक-पुणे हवाई सेवेची वैशिष्टय़े
’अवघ्या ४५ मिनिटांचा प्रवास
’ तिकीट दर ५,९९९ रुपये
’नियमित दोन फेऱ्यांचे नियोजन

सिंहस्थासाठी खास नियोजन
सिंहस्थ कुंभमेळ्यात देशभरातून लाखो भाविक नाशिक व त्र्यंबकेश्वर नगरीत दाखल होणार आहेत. शाही पर्वणीच्या दिवशी नाशिक-त्र्यंबकेश्वर हवाई दर्शनासाठी खास फेऱ्यांचे नियोजन करण्यात येत आहे. या विमान प्रवासाद्वारे प्रवाशांना दोन्ही ठिकाणच्या कुंभमेळ्यातील विहंगम दृश्य पाहता येईल. सिंहस्थात परराज्यातून येणारे भाविक या विमान सेवेचा लाभ घेऊ शकतील.