सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पाश्र्वभूमीवर शहरातील काही भागांचे भाग्य उजळले असले तरी करण्यात येणाऱ्या कामांच्या दर्जाबद्दल त्या त्या भागातील लोकप्रतिनिधी तसेच नागरिकांकडूनच संशय व्यक्त करण्यात येत आहे. त्यातच एकमेकांना जोडणाऱ्या काही गोल रस्त्यांच्या रुंदीकरणाऐवजी केवळ डांबरीकरणाचा मुलामा देऊन नागरिकांची अक्षरश: फसवणूक करण्यात आल्याचे उघड होत आहे. मेरी, म्हसरूळ रस्त्याला जोडणारा रासबिहारी रस्ता हे या फसवणुकीचे उत्तम उदाहरण असून भरमसाट वाहतूक वाढलेल्या या रस्त्याचे मूळ दुखणे दूर करण्याऐवजी महापालिका प्रशासनाच्या वतीने भलताच उपचार करण्यात आला आहे.
दर बारा वर्षांनी येणारा सिंहस्थ आपल्यासोबत नाशिकच्या विकासाची पोतडी घेऊन येतो. सिंहस्थासाठी मिळणाऱ्या निधीचा पुरेपूर वापर करून शहराचा चेहरामोहरा बदलण्यासाठी खरे तर ही सुवर्णसंधी मानावयास हवी. परंतु सिंहस्थ कधी सुरू होणार हे कित्येक वर्षे आधीच माहीत असतानाही निधीचे कारण पुढे करत नियोजनात पालिका प्रशासन कमी पडत आहे. इतकी वर्षे सिंहस्थाच्या कामांविषयी कोणत्याच हालचाली करण्यात आल्या नाहीत. आता सिंहस्थाची तारीख जवळ येऊ लागल्यावर प्रशासनाची कामे पूर्ण करण्यासाठी धावपळ उडाली आहे. शहरातील कोणत्या ना कोणत्या भागात रस्ता दुरुस्तीची कामे सुरू असल्याचे दिसून येईल. गेल्या कित्येक वर्षांपासून मागणी करूनही न झालेल्या कामांना आता सिंहस्थामुळे गती मिळाली असून ‘रात्र थोडी सोंगं फार’ अशी स्थिती निर्माण झाल्यामुळे प्रशासनाकडूनही काही कामांना कात्री लावण्यात येत आहे. तर, काही कामांच्या बाबतीत चलाखी करण्यात येत आहे. त्याचे उदाहरण म्हणून पंचवटीतील मेरी, म्हसरूळ मार्म आणि मुंबई-आग्रा महामार्ग या दोघांना जोडणाऱ्या रासबिहारी जोडरस्त्याचे देता येईल.

आडगाव, सय्यद पिंप्री, दसक, पंचक, शिलापूर, माडसांगवी आदी गावांकडून बाजार समितीत जाण्यासाठी येणारी वाहने निमाणीमार्गे जात. त्यामुळे पंचवटीतील वाहतुकीत भर पडून वाहतूक कोंडी निर्माण होत असे.
ही वाहने रासबिहारी जोडरस्त्याने जाऊ लागल्याने पंचवटीतील वाहतूक कोंडीवर पर्याय निघाला. शिवाय सप्तशृंगगड किंवा गुजरातकडे जाण्यासाठी ओझरकडून येणाऱ्या वाहनांना थेट पंचवटीत जाऊन मारावा लागणारा फेरा या मार्गामुळे कमी झाला. या कारणांमुळे रासबिहारी जोड रस्त्यावरील वाहतुकीत कमालीची वाढ झाली आहे. वाहतूक वाढली तरी रस्त्याची कोणतीही दुरुस्ती न झाल्याने अपघातांच्या प्रमाणातही वाढ झाली. पालिकेकडून सिंहस्थाच्या पाश्र्वभूमीवर या रस्त्याचे रुंदीकरण करण्याचे नियोजन होते. परंतु पालिका प्रशासनाने केवळ रस्ता डांबरीकरण करण्यावर भर दिला. डांबरीकरणाचा दर्जाही उत्कृष्ट नसल्याची ओरड होत असून डांबरीकरणामुळे केवळ रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे काम झाले आहे. रस्ता रुंदीकरण न झाल्याने होणाऱ्या अपघातांवर कसे नियंत्रण मिळविणार, हा प्रश्न अनुत्तरितच आहे. सिंहस्थात गुजरातकडून पंचवटीत येणाऱ्या वाहनांमुळे या जोडरस्त्यावरील वाहतुकीत अधिकच भर पडण्याची शक्यता असल्याने अपघातांच्या प्रमाणात वाढ होण्याचा धोका कायम आहे. पालिका प्रशासनाने अजूनही या जोड रस्त्याचे रुंदीकरण करण्याची गरज परिसरातील लोकप्रतिनिधी व नागरिकांकडून व्यक्त होत आहे.