शहरात सर्वत्र सध्या अस्वच्छता, कचरा आढळून येत असून त्यामुळे डासांच्या प्रमाणात प्रचंड वाढ झाली आहे. डासांमुळे डेंग्यूसदृश आजारासह इतर अनेक साथीचे आजार फैलावले आहेत. नाशिककरांच्या आरोग्याचे तीनतेरा वाजले असताना शहरात प्रशासन कुठेच दिसत नाही. सत्ताधाऱ्यांनी याप्रश्नी लक्ष देण्याची मागणी होत आहे.
दीपावलीपासून शहरात अस्वच्छतेने कळस गाठला आहे. रस्त्यारस्त्यांवर कचऱ्याचे ढीग साचलेले दिसत असून या अस्वच्छतेमुळे डासांचे प्रमाणही वाढले आहे. शहरातील सर्वच भागांमध्ये डासांचा उच्छाद पाहावयास मिळत आहे. विशेष म्हणजे डासांपासून आतापर्यंत जो भाग वंचित राहिला होता, अशा विविध कॉलनी भागांमध्येही डासांचे प्रमाण वाढले आहे. सिडको, अंबड, इंदिरानगरसह पंचवटीतील अमृतधाम, विडी कामगारनगर, औदुंबरनगर, लक्ष्मीनगर, हनुमाननगर परिसर डासांमुळे पुरता बेजार झाला आहे. डासांमुळे आजारही वाढले आहेत. त्यामुळे या भागातील सर्वच लहानमोठी रुग्णालये रुग्णांच्या गर्दीमुळे तुडुंब भरलेली दिसत आहेत. विशेषत: लहान मुले डासांमुळे होणाऱ्या आजारास लवकर बळी पडत असल्याने महापालिकेच्या भरवशावर राहण्यापेक्षा नागरिकांनी घरात डास येऊ नयेत यासाठी स्वत:च विविध प्रकारचे उपाय करण्यास सुरुवात केली आहे. त्यात घरासह परिसरात विविध वनस्पतींचा धूर करणे, मच्छर अगरबत्ती आणि मच्छरदाणीचा वापर असे उपाय आरंभिले आहेत. महापालिकेकडून या परिसरात कोणत्याच प्रकारची औषध फवारणी किंवा धूर फवारणी झालेली नाही. डासांमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असताना स्थानिक लोकप्रतिनिधी मात्र शांत आहेत. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान घरोघरी फिरणाऱ्या लोकप्रतिनिधींनी आता पुन्हा एकदा घरोघरी फिरून आपल्या भागातील आरोग्यविषयक परिस्थिती जाणून घ्यावी, अशी मागणीही नागरिकांकडून होत आहे.
डासांमुळे शहरात डेंग्यूसदृश रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. अलीकडेच जुन्या नाशिक परिसरात डेंग्यूमुळे एका मुलास आपले प्राणही गमवावे लागले. अस्वच्छतेमुळे परिस्थिती इतकी बिघडली असतानाही महापालिका प्रशासनाकडून फारशा उपाययोजना करण्यात येत नसल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. नेतेमंडळी केवळ फोटोसेशन करण्यासाठी हातात झाडू घेऊन स्वच्छता करण्यात गुंग असल्याचे दर्शवीत आहेत. एकदा फोटो प्रसिद्ध झाल्यानंतर रस्त्याने दिसणाऱ्या अस्वच्छतेकडे ते ढुंकूनही पाहात नसल्याचे दिसून येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपआपल्या परिसरात लोकप्रतिनिधींसह सर्वानाच स्वच्छता अभियान राबविण्याची सूचना केली असली तरी त्यांच्या सूचनेकडे सर्वाकडून पूर्णपणे दुर्लक्ष करण्यात येत आहे. गोदातीरी निर्माल्य टाकण्यासाठी महापालिकेच्या वतीने निर्माल्य कलश ठेवण्यात आले असले तरी भाविकांकडून कलशमध्ये निर्माल्य टाकले जात नाही. कलशाजवळ किंवा नदीमध्ये ते टाकण्यात येत असल्याने जलप्रदूषण तर होतेच, शिवाय कलशाजवळ साचलेल्या निर्माल्यामुळे डासांच्या उत्पत्तीस पोषक परिस्थिती तयार होते. आपल्या परिसरात कुठेही कचरा साचून अस्वच्छता निर्माण होणार नाही, याकडे नागरिकांचे प्रबोधन करण्यासाठी लोकप्रतिनिधींनी, नगरसेवकांनी आपआपल्या भागात जनप्रबोधनात्मक कार्यक्रमांची अंमलबजावणी करण्याची गरज व्यक्त केली जात आहे.