आर्थिक फायदा करून देण्याचे आमिष दाखवून अडीच लाखांचे दागिने पळवले

नाशिकमधील घटना

धार्मिक विधीचे कारण सांगून आलेल्या एका भामट्यानं महिलेच्या अंगावरील अडीच लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लुबाडल्याचा प्रकार समोर आला आहे. नाशिक शहरात ही घटना घडली असून, नाशिक रोड पोलीस ठाण्यात याप्रकरणी तक्रारीनंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पद्मा साधवानी (५४, रा. नाशिक रोड) बुधवारी घरी असताना एक अनोळखी व्यक्ती आली. तुमच्या घराशेजारी असलेल्या शिवमंदिरात पूजा करायची आहे. दक्षिणा म्हणून एक हजार १०० रुपये आणि पूजेचे सामान द्यायचे आहे. मात्र मंदिरात पुजारी नसल्याने आपण पुजारी आल्यावर त्यांना हे सामान देऊन टाका, असे त्याने सांगितले.

पद्मा यांना बोलण्यात गुंतवून इगतपुरी येथे आपण नवीन सराफ पेढी सुरू करत असल्याची बतावणी त्याने केली. तुमचे दागिने आपल्याकडे दिल्यास नवीन दुकानाची वृद्धी होईल. त्यामुळे आर्थिक फायदा होईल, असे सांगत पद्मा यांचा विश्वास संपादन केला. संशयिताच्या बोलण्याला भुलून पद्मा यांनी त्यांच्या गळ्यातील सोनसाखळी आणि हातातील दोन सोन्याच्या बांगडय़ा एका पिशवीत टाकल्या. त्यानंतर संशयिताने त्याच्याकडील दक्षिणा, पूजेचे सामान आणि दागिने पद्मा यांच्या घरातील देव्हाऱ्यात ठेवले. पुजारी आल्यावर त्यांना हे देऊन टाका, असे सांगून तो निघून गेला. दरम्यान, पद्मा यांनी देव्हाऱ्यात ठेवलेली आपली पिशवी उघडून पाहिली असता त्यात फक्त फुलांचा हार आणि काचेच्या बांगडय़ा दिसल्या. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी नाशिक रोड पोलीस ठाणे गाठत फसवणुकीची तक्रार दाखल केली.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व नाशिक बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Unknown person looted orgment in nashik bmh

ताज्या बातम्या